
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर (हिं.स.)।निवडणूक आयोग पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एआयच्या मदतीने बनावट आणि मृत मतदारांची ओळख पटविण्यात मदत होईल. एआय तंत्रज्ञान मतदार डेटाबेसमधील छायाचित्रांवर चेहऱ्यांची समानता तपासेल, ज्यामुळे अनेक ठिकाणी नोंद असलेल्या मतदारांना शोधून काढणे सोपे होईल.
अधिकाऱ्याने म्हटले की, “मतदारांच्या छायाचित्रांचा, विशेषतः स्थलांतरितांच्या फोटोचा, चुकीच्या वापराच्या तक्रारी वाढत असल्यामुळे आम्ही एआयची मदत घेत आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, एकाच मतदाराचा फोटो मतदार यादीतील अनेक ठिकाणी दिसत असल्यास, एआयची फेस-मॅचिंग तंत्रज्ञान त्या प्रकरणांचा शोध घेईल.तथापि, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की बूथ-स्तरीय अधिकारी (बीएलओ) सत्यापन प्रक्रियेत केंद्रस्थानी असतील. त्यांनी सांगितले, “एआय तंत्रज्ञान सत्यापनात मदत करेल, पण तंत्रज्ञानाच्या वापरानंतरही बीएलओची भूमिका महत्त्वाचीच राहील. त्यांना घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो घ्यावे लागतील.” इतकेच नव्हे, तर बूथ-स्तरीय एजंट (बीएलए) भरलेले फॉर्म जमा करत असले तरी, स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी बीएलओंना प्रत्यक्ष घरोघरी जावे लागेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हिशेब आणि फॉर्म तपासणीनंतर जर एखादा बनावट किंवा मृत मतदार आढळला, तर त्याची जबाबदारी संबंधित मतदान केंद्राच्या बीएलओवर असेल.”
अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हरियाणाच्या निवडणुकांतील ब्राझिलियन मॉडेलच्या फोटो असलेल्या ओळखपत्रांचे प्रकरण उघड केले होते. त्यांनी या प्रकरणावरून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे असे मानले जात आहे की, एआय तंत्रज्ञानामुळे कोणत्याही मतदाराचा फोटो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता फारच कमी होईल.निवडणूक आयोगाने मागील महिन्यात देशात एसआयआर प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली होती. या टप्प्यात देशातील १२ राज्यांचा समावेश केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, पुडुचेरी, मध्य प्रदेश, लक्षद्वीप, केरळ, गुजरात, गोवा, छत्तीसगड तसेच अंडमान-निकोबार येथे एसआयआर प्रक्रिया राबवली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode