
लातूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूरची नाट्य परंपरा खुप मोठी आहे. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम गोजमगुंडे, प्राचार्य के. ह. पुरोहीत, प्रा. मिरजकर, प्रा. गोवंडे या मंडळींनी लातूरच्या नाट्य चळवळीचा पाया रचला आणि नाट्यकर्मींच्या त्यागातूनच नाट्य चळवळ जीवंत आहे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अशोक आरदवाड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात सुरु झाली. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अशोक आरदवाड यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रा. डॉ. दीपक वेदपाठक, धनंजय बेंबडे, परिक्षक चंद्रशेखर गोखले, अंजली पटवर्धन, विवेक खेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. अशोक आरदवाड म्हणाले, नाटक उभ करणे खुप मोठे कष्ट आहे. ही स्पर्धा आहे. यात परिक्षक आणि प्रेक्षक हे दोन महत्वाचे घटक आहेत. परिक्षक परिक्षणाचे काम करतील. पण प्रेक्षक हा रंगकर्मींसाठी अतिमहत्वाचा घटक असतो. प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवत रंगकर्मींनी नटराजाच्या चरणी नाट्यकला सादर करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक बाळकृष्ण धायगुडे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत बाळकृष्ण धायगुडे, सुभाष गिरी, अशोक मोहळ, संग्राम जल्दे, जीवन वाघमारे यांनी केली. सुत्रसंचालन आनंद सरवदे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis