अमरावती जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आज अंतिम मुदत
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्याच्या युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन बुधवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी क
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आज अंतिम मुदत इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन


अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्याच्या युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन बुधवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी संस्था/मंडळे किंवा वैयक्तिक स्पर्धकांनी आपले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक विद्यापीठ समोर, मार्डी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, काव्यलेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि कौशल्य विकास स्पर्धांसह विज्ञान प्रदर्शन (नवोपक्रम ट्रॅक) चा समावेश आहे. महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड, तपोवन चौक येथे होणार असून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्री शिवाजी उद्यान विज्ञान महाविद्यालयात करण्यात येणार आहे.

या महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील (दि. 12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना) महाराष्ट्रातील रहिवासी युवक-युवती सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी My Bharat Portal वर नोंदणी करणे बंधनकारक आहे. कौशल्य विकास स्पर्धा जसे कथालेखन (60 मि.), काव्यलेखन (90 मि.) आणि चित्रकला (90 मि.) यासाठी 'नशा मुक्त युवा', 'तरुणाईची निरोगी जीवनशैली', 'नेतृत्वातील महिला', 'भारत @100: सर्वसमावेशक विकासासाठी रूपरेषा' यासारखे विषय देण्यात आले आहेत. कथालेखन व काव्यलेखनासाठी मरााठी, हिंदी व इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा निवडता येईल. विज्ञान प्रदर्शनात जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या अभिनव संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करता येतील. या महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यांची निवड थेट विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी केली जाईल, ज्यातून पुढे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (जानेवारीमध्ये) संधी मिळेल. जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच वरिष्ठ व कनिष्ठ पमहाविद्यालयातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande