
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 2025 हे वर्ष 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 'मेरा युवा भारत' (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत या सोहळ्याचे औचित्य साधून, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त (31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 'सरदार@ 150 अभियान') देशभर राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत आज जिल्हास्तरीय 'युनिटी पदयात्रा'चे आयोजन मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथे करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, , महानगरपालिका अमरावतीचे उपआयुक्त नरेंद्र वानखेडे, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी, राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी पथनाट्ये आणि सांस्कृतिक नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली, तसेच उपस्थितांनी आत्मनिर्भर भारताची शपथ घेतली. त्यानंतर, मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथून सुरू झालेली ही 'सरदार@ 150' पदयात्रा इर्विन चौक मार्गे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहातून परत महाविद्यालयाकडे मार्गस्थ झाली.
मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, तसेच एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, होमगार्ड, भारत स्काऊट गाईड आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकवृंद, हजारो विद्यार्थी व स्वयंसेवक या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि 'एक भारत, आत्मनिर्भर भारत' चा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी