रत्नागिरी : डेरवणला २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा मैदानी निवड चाचणी
रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे पहिल्या अस्मिता जिल्हा लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवत्ता शोधमोहिमेअंतर्गत ही स्पर्धा १४ व १६ वर्षांखालील मुलींसाठी घेण्यात येणार आहे.
रत्नागिरी : डेरवणला २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा मैदानी निवड चाचणी


रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे पहिल्या अस्मिता जिल्हा लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवत्ता शोधमोहिमेअंतर्गत ही स्पर्धा १४ व १६ वर्षांखालील मुलींसाठी घेण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा अस्मिता लीग २१ नोव्हेंबरला डेरवण येथील एसव्हीजेसिटी क्रीडासंकुलात होईल.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १४ वर्षांखालील मुली २१ डिसेंबर २०११ ते २० नोव्हेंबर २०१३ या कालावधीत जन्मलेल्या असाव्यात. १४ वर्षांखालील मुलींसाठी ट्रायथलॉन ए गटात ६० मी. धावणे, लांब-उंच उडी असे प्रकार असतील. ट्रायथलॉन बीमध्ये ६० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक), ट्रायथलॉन सीमध्ये ६० मीटर धावणे, ६०० मी. धावणे, लांब उडी असे क्रीडाप्रकार समाविष्ट आहेत. खेळाडूंनी यामधील एक ग्रुप निवडायचा आहे. १६ वर्षांखालील मुली २१ डिसेंबर २००९ ते २० डिसेंबर २०११ या कालावधीत जन्मलेल्या असावेत. या गटासाठी ६० मीटर धावणे, ६०० मी. धावणे, लांब, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे क्रीडाप्रकार आहेत. स्पर्धेसाठी भारतातील नामवंत क्रीडा मार्गदर्शक खेळाडूंची गुणवत्ता तपासण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतून गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

जिल्हा स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना पदक व प्रावीण्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी आकारण्यात येणार नाही. देशातील ३०० जिल्ह्यांचा या गुणवंत खेळाडू शोधमोहिमेसाठी समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, प्रशिक्षक अविनाश पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande