
दुबई, १९ नोव्हेंबर (हिं.स.): आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे खेळवली जाणार आहे. यावर्षी १६ संघ एकूण ४१ सामन्यांमध्ये विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत. अंतिम सामना ६ फेब्रुवारी रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाणार आहे.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे टांझानिया पहिल्यांदाच १९ वर्षांखालील विश्वचषकात सहभागी होणार आहे. त्यांचा पहिला सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. सर्व सराव सामने ९ ते १४ जानेवारी दरम्यान खेळवले जातील.
उद्घाटन दिवसाचे सामने (१५ जानेवारी)
भारत विरुद्ध अमेरिका - क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड - ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब
टांझानिया विरुद्ध वेस्ट इंडिज - एचपी ओव्हल, नामिबिया
स्पर्धेचे स्वरूप
या स्पर्धेत प्रत्येकी चार संघांचे चार गट असतील. त्यानंतर सुपर सिक्स टप्पा, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.
गतविजेता ऑस्ट्रेलिया १६ जानेवारी रोजी विंडहोक येथे आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळेल. १७ जानेवारी रोजी बुलावायो येथे भारत आणि बांगलादेश एकमेकांसमोर येतील.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले की, ही स्पर्धा नेहमीच भविष्यातील युवा क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखविण्याचे व्यासपीठ राहिले आहे. ब्रायन लारा, सनथ जयसूर्या, विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि शुभमन गिल असे अनेक महान क्रिकेटपटू या स्पर्धेतून उदयास आले आहेत. ते म्हणाले की, हा विश्वचषकही तरुण क्रिकेटपटूंसाठी आपली स्वप्ने पूर्ण करण्याची एक उत्तम संधी आहे. त्यांनी पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकात सहभागी झालेल्या टांझानियाच्या संघाचे स्वागत केले.
सराव सामने (९-१४ जानेवारी)
भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ विविध ठिकाणी सराव सामने खेळणार आहेत.
मुख्य स्पर्धेचे सामने (१५ जानेवारी-७ फेब्रुवारी)
ग्रुप स्टेज आणि सुपर सिक्स सामने १५-३१ जानेवारी दरम्यान खेळवले जातील.
उपांत्य फेरीचे सामने ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी होतील, ५ फेब्रुवारी हा राखीव दिवस असेल.
अंतिम सामना ६ फेब्रुवारी रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाईल, ७ फेब्रुवारी हा राखीव दिवस असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे