भारताचा आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश
दोहा, 19 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय संघाने आपला दुसरा सामना जिंकत आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने ओमानचा ६ विकेट्सने पराभव केला. हर्ष दुबेने नाबाद अर्धशतक झळकावले आणि एक
भारताचा आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश


दोहा, 19 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय संघाने आपला दुसरा सामना जिंकत आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने ओमानचा ६ विकेट्सने पराभव केला. हर्ष दुबेने नाबाद अर्धशतक झळकावले आणि एक विकेट घेतली.

भारत अ संघाचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ओमानने २० षटकांत ७ विकेट्स गमावून १३५ धावा केल्या. वसीम अलीने नाबाद ५४ धावा केल्या. भारताकडून गुर्जपनीत सिंग आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाने १७.५ षटकांत ४ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. भारतीय संघाकडून हर्ष दुबेने नाबाद ५३ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमानच्या सलामीवीरांनी ४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ३७ धावा केल्या. कर्णधार हम्माद मिर्झा १६ चेंडूत ३२ धावा काढून बाद झाला. त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने डावात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. विजयकुमार वैशाखच्या चेंडूवर हम्मादला आशुतोष शर्माने झेल दिला. ओमानसाठी दुसऱ्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आलेल्या वसीम अलीने शानदार फलंदाजी केली. त्याने ४५ चेंडूत ५४ धावा काढल्या. टी-२० मधील त्याचे हे पहिलेच अर्धशतक होते. अली १२० च्या स्ट्राईक रेटने खेळला. त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारला. भारताकडून गुर्जपनीत सिंग आणि सुयश शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. हर्ष दुबे, विजयकुमार वैशाख आणि नमन धीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मागील दोन सामन्यांमध्ये भारताकडून शानदार फलंदाजी करणारा वैभव सूर्यवंशी १३ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. त्याला जय ओडेदराच्या गोलंदाजीवर आर्यन बिष्टने झेलबाद केले. सलामीवीर प्रियांश आर्य देखील फारशी कामगिरी करू शकला नाही. तो ६ चेंडूत १० धावा करून बाद झाला. पहिल्या विकेटनंतर फलंदाजीला आलेल्या नमन धीरने मैदानावर सर्वत्र फटकेबाजी केली. त्याने १९ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. नमनला समय श्रीवास्तव यांनी बाद केले.

नमन बाद झाल्यानंतर संघाने अष्टपैलू हर्ष दुबेला फलंदाजी क्रमात बढती दिली. हर्षने नेहल वधेरासोबत चौथ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ६६ धावांची भागीदारी करून सामन्यात भारताचा विजय निश्चित केला. हर्षने शानदार फलंदाजी केली आणि ४४ चेंडूत ५३ धावा केल्या. १२०.४५ च्या स्ट्राईक रेटने खेळताना हर्षने या डावात ७ चौकार आणि एक षटकारही मारला.

वधेरा २४ चेंडूत २३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने या डावात एक षटकारही मारला. नेहलला आर्यन बिष्टने बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार जितेश शर्माने आर्यनच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकून दिला. ओमानकडून जय ओडेदरा, शफीक जैन, समय श्रीवास्तव आणि आर्यन बिष्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande