
रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। क्रीडा क्षेत्रात रायगड जिल्ह्याचा मान वाढवत सोमजाई कृपा श्रीवर्धनची प्रतिभावान खेळाडू कु. तनिषा सुहास साखरे हिने दमदार कामगिरीची छाप उमटवली आहे. तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आपली कामगिरी सिद्ध करत तनिषाने जिल्हा निवड चाचणीत विशेष गुणस्थान मिळवले असून, याच कामगिरीच्या जोरावर तिने 25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान बोपखेल, पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य 52 वी कुमारी गट चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघात आपली अधिकृत निवड पक्की केली आहे. राज्यस्तरीय व्यासपीठावर तनिषाला मिळालेली ही मोठी संधी तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे यश मानले जात आहे.
वाघोडे येथे 15 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमारी गट निवड चाचणीत तनिषाने उत्कृष्ट तंत्र, शिस्तबद्ध खेळशैली आणि जिद्दीच्या बळावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यात तिने दाखवलेली आत्मविश्वासपूर्ण कामगिरी विशेष ठरली.
तनिषाच्या यशामुळे सोमजाई कृपा संघटना तसेच श्रीवर्धन तालुका आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मान अभिमानाने उंचावला आहे. प्रशिक्षक, पालक आणि स्थानिक क्रीडा प्रेमींनी तनिषाचे कौतुक करत तिच्या पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यस्तरावरही ती आपली चमक दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून तनिषा साखरे भविष्यात जिल्ह्याला गौरव मिळवून देणारी उद्योन्मुख खेळाडू म्हणून पुढे येत असल्याचे मत क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके