
पाटणा, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।नीतीश कुमार यांनी आज (दि.२०) पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात त्यांनी डझनभर मंत्र्यांसह पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी गांधी मैदानात हजारोंची गर्दी जमली होती. या शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी यांनी नीतीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या.
नीतीश कुमार यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नीतीश कुमारजींना हार्दिक अभिनंदन. ते अनुभवी प्रशासक आहेत आणि अनेक वर्षांपासून सुशासनाचा उत्कृष्ट विक्रम त्यांनी ठेवला आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा.”
पुढे डिप्टी सीएम झालेले सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना शुभेच्छा देताना त्यांनी लिहिले, “बिहारचे उपमुख्यमंत्री बनल्याबद्दल सम्राट चौधरीजी आणि विजय सिन्हाजींना हार्दिक शुभेच्छा. दोन्ही नेते जनसेवेत दीर्घकाळ कार्यरत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा.”
यासोबतच पुढे मंत्रिमंडळालाही शुभेच्छा देत पंतप्रधान मोदी म्हणाले:“बिहार सरकारमधील सर्व मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा. ही एक उत्कृष्ट टीम आहे, ज्यामध्ये समर्पित नेते आहेत, जे बिहारला नवीन उंचीवर नेतील. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode