
नागपूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : जगात प्रचंड प्रमाणात ज्ञान उपलब्ध आहे आणि ते ग्रहण करणे आवश्यक आहे. मात्र, आपल्याला सनातन ज्ञान आणि ऐतिहासिक अनुभवातूनही शिकण्याची गरज आहे. आपल्या ऐतिहासिक साहित्यामध्ये एवढी क्षमता आहे की आपण संपूर्ण जगाला मार्गदर्शन देऊ शकतो, परंतु त्यासाठी प्रथम आपल्याला ती समजून घ्यावी लागेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. एसजीआर फाऊंडेशनतर्फे नागपुरात आयोजित सातव्या ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हलच्या उद्घाटनसमारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्रात झाली. या वेळी माजी खासदार अजय संचेती, डॉ. राजन वेळूकर, सुनिल रायसोनी, पवन सिन्हा, आशुतोष शेवाळकर, डॉ. निलेश ओक आणि चंद्रचूड घोष उपस्थित होते. यावेळी आंबेकर म्हणाले की, “आपल्या देशात पारंपरिक ज्ञानाचा मोठा ठेवा आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपल्याला अपेक्षित त्या प्रमाणात ते शिकवले गेले नाही. आता हळूहळू बदल दिसत आहेत; उदाहरणार्थ, अकबर आणि टिपू सुलतान यांना महान म्हणून केवळ दाखवले जात नाही. इतिहासातील वास्तव, जसे की भारतावर आक्रमण करणाऱ्यांनी स्थानिक जनतेवर केलेला क्रूरपणा, नवीन पिढीला सांगणे आवश्यक आहे. त्यांनी नालंदा विद्यापीठाचे उदाहरण देताना सांगितले की, “तेथे केवळ पुराण आणि वेद शिकविले जात नसून, साहित्य व कौशल्यावर आधारित 76 अभ्यासक्रम होते, ज्यात गुप्तहेरापासून राजकीय प्रशासनापर्यंतचे शिक्षण दिले जात असे. इतिहास समजून घेतल्यास आपली विचारशक्ती अधिक सुदृढ होईल.
आंबेकर यांनी पुढे सांगितले की, “आपल्या साहित्यात शास्त्र व विज्ञानाचे मोठे ठेवा आहे, आणि त्याबाबत खुल्या मनाने विचार करणे आवश्यक आहे. विशेषतः नवीन पिढीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. देश आर्थिक दृष्ट्या समृद्ध होत आहे, परंतु पूर्वजांप्रमाणे समृद्धीसोबत सुख आणि शांतीचा भावही ठेवणे आवश्यक आहे. इतिहास समजून घेतल्यासच हे साध्य होईल अमेरिकेतील शहरी समस्यांवर भाष्य करताना ते म्हणाले की, न्यूयॉर्कमधील महापौरांच्या निवडीनंतर अनेक चर्चांना चालना मिळाली आहे. शहरांमध्ये अपरिचित लोकांचे प्रमाण वाढले असून एकत्रित कुटुंब व संवादाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आपल्या देशात देखील ही स्थिती हळूहळू निर्माण होत आहे. ज्वाज्वल्य इतिहास व साहित्याने नवीन पिढीला शिक्षित केल्यास शास्त्र, विज्ञान आणि सामाजिक मूल्यांचा संदेशही पोहोचेल.यावेळी आंबेकर यांनी राम मंदिर आंदोलनाबाबत स्पष्ट केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न फक्त मंदिर उभारण्यासाठी नव्हते, तर राम आणि रामाच्या संस्कृतीचा देशाच्या सांस्कृतिक परंपरेशी नाते काय आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके