

रायपूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - आदिवासी समुदायांचे योगदान हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. प्राचीन गणराज्यांमध्ये तसेच बस्तरमधील ‘मुरिया दरबार’ सारख्या अनेक आदिवासी परंपरांमध्ये त्याची उदाहरणे आढळतात, जे तेथील लोकांचे आद्य संसद स्वरूप आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या दशकात आदिवासी समुदायांच्या विकास आणि कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर अनेक योजना आखण्यात आल्या आणि अंमलातही आणल्या गेल्याचे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 नोव्हेंबर) छत्तीसगडमधील अंबिकापूर, सरगुजा येथे छत्तीसगड सरकारने आयोजित केलेल्या आदिवासी गौरव दिवस सोहळ्याला उपस्थित होत्या.
भारत सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे, जे आदिवासी समाजाच्या विकासाला नवी ऊर्जा देईल, असे त्या म्हणाल्या. या अभियानांतर्गत देशभरात सुमारे 20 लाख स्वयंसेवकांचे जाळे निर्माण केले जात आहे. हे स्वयंसेवक तळागाळात कार्य करून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास होईल, यांची खात्री करतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
देशभरात,तसेच छत्तीसगडमध्येही, नक्षलवादी, नक्षलवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत, याबद्दल राष्ट्रतींनी आनंद व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त, सुव्यवस्थित प्रयत्नांमुळे निकट भविष्यकाळात नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करणे शक्य होईल, असेही त्या म्हणाल्या. नुकत्याच पार पडलेल्या ‘बस्तर ऑलिंपिक्स’मध्ये 1,65,000 हून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी आदर्शांचे अनुसरण करून छत्तीसगडमधील लोक आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीत मौल्यवान योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी