मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध; चिखलदऱ्यात काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ जणांची माघार
आमदार राणांना मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.) नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे. सर्वत्र चढाओढीचे राजकारण पहायला मिळत आहे. एकीकडे, नेते बंडखोरांची मनधरणी करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे, निवड
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध; चिखलदऱ्यात काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ जणांची माघार आमदार राणांना मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिल्या  शुभेच्छा


आमदार राणांना मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा

अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)

नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे. सर्वत्र चढाओढीचे राजकारण पहायला मिळत आहे. एकीकडे, नेते बंडखोरांची मनधरणी करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे, निवडणूक अविरोध व्हावी, असा प्रयत्नही केला जात आहे. चिखलदरा नगरपालिकेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कलोती कुटुंबीयांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.

दरम्यान, आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने आल्हाद कलोती यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) चिखलदरा येथील नेते आणि तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेले राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी १५ माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. राजेंद्रसिंह सोमवंशी यांना भाजपतर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही निवडणूक सोमवंशी यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची बनली आहे.

दरम्यान, आज काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील तसेच नथ्थू खडके आणि नऊ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने आल्हाद कलोती यांची अविरोध निवड झाली आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. हा दूरदृष्टीचा विजय आहे, असे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले.

आल्हाद कलोती यांच्या अविरोध निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना रवी राणा यांनी चिखलदऱ्याच्या विकासाचा थेट संबंध मुख्यमंत्र्यांच्या आवडीशी जोडला. रवी राणा म्हणाले, चिखलदरा हे देवेंद्र फडणवीस यांचे आवडते आणि आपुलकीचे ‘हिल स्टेशन’ आहे. आल्हाद कलोती निवडून आल्याने येथील विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. कलोती परिवाराने अंध विद्यालय, शैक्षणिक क्षेत्र, तसेच गवळी, आदिवासी, ओबीसी व कलार समाजासाठी केलेल्या भरीव कार्याचा वारसा आल्हाद कलोती पुढे नेत आहेत. ‘स्काय वॉक’, पर्यटन विकास, रस्ते सुविधा, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प आणि विद्युत प्रकल्पांसारखे मोठे प्रकल्प कलोती यांच्यामुळेच मार्गी लागतील.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह सोमवंशी आणि आल्हाद कलोती उपस्थित होते.

चिखलदरा विजयावरून काँग्रेसचा हल्लाबोल;

फडणवीसांवर सपकाळ यांचे थेट आरोप

चिखलदरा नगरपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अविरोध विजयी झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र टीका करत सरकारवर गंभीर आरोप केले.सपकाळ म्हणाले, “मत चोरी हा पहिला भाग होता; आता उमेदवार चोरी ही दुसरी पायरी सुरू झाली आहे.” तिथे वास्तव्यास नसलेल्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे हे मुख्यमंत्र्यांचे अशोभनीय कृत्य असून याचा तीव्र निषेध असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी आरोप केला की मुख्यमंत्र्यांचे एक मामेभाऊ धर्मदाय आयुक्त असून ते जमिनींची विक्री करतात, तर दुसऱ्याला नगरसेवक बनवून चिखलदराच्या जमिनी खरेदी करण्याचा डाव रचला जात आहे. “ही गुंडशाही असून आता ती आम्ही खपवून घेणार नाही,” असा सपकाळ यांचा संताप व्यक्त झाला.उमेदवारांना धमक्या, अपहरण, आमिषे, आर्थिक दबाव, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला. “चिखलदरा प्रकरणाचे मुख्य सूत्रधार स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत,” असा थेट आरोप सपकाळ यांनी केला.

“मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग, धमक्या व पैशांचा खेळ”

ठाकूरांचा फडणवीसांवर आरोप

चिखलदरा नगरपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती अविरोध विजयी झाल्यानंतर अमरावतीचे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले.

ठाकूर म्हणाल्या, “कलोती यांचा पराभव झाला असता तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली असती. त्यामुळेच त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेत दमदाटी, धमक्या, पैशांचा वापर आणि गुंडागर्दी केली. मुख्यमंत्री पदाचा खुलेआम दुरुपयोग केला.”तिथल्या जमिनीवर मुख्यमंत्र्यांचा डोळा असल्याचाही त्यांनी दावा केला. “देवेंद्र फडणवीस हे इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील. संविधानाची तोडफोड करण्याची पद्धत सुरू आहे,” अशी ठाकूरांची टीका होती.भाजपवर हल्ला चढवत त्यांनी म्हटले की, “भाजपमध्ये ओरिजनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त झाले आहेत. कलोतींचा पराभव होऊ नये म्हणून पक्षाने दबाव आणला. शिवाय भाजप आज रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे.” या विधानांमुळे चिखलदरा विजयाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande