
- सुनील कुमार सक्सेना
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हि.स.) : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) संचालक मनोज कुमार यांनी सांगितले की खादी हा केवळ एक उत्पादन नाही, तर एक विचार आहे आणि आत्मनिर्भर भारत तसेच स्वदेशीचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी’ आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या दृष्टिकोनानुसार युवकांना जोडण्यात केव्हीआयसी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधानांच्या या मंत्रामुळे संपूर्ण भारत एकत्र आला असून गेल्या 11 वर्षांत खादी हे सर्वात विश्वासार्ह ब्रँड बनले आहे.
भारत मंडपम येथे 14 ते 27 नोव्हेंबरदरम्यान सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील खादी पॅव्हेलियनला भेट देण्यासाठी आलेल्या मनोज कुमार यांनी ‘हिंदुस्थान समाचार’शी विशेष संवाद साधला. या दरम्यान त्यांनी सांगितले की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2 ऑक्टोबर रोजी खादी भवनात येऊन खादी वस्तू खरेदी करून एक मोठा संदेश दिला की देशातील प्रत्येक कुटुंबाने वर्षातून एकदा पाच हजार रुपयांची खादीची खरेदी करावी. त्या नंतर खादीबद्दल लोकांचा कल आणखी वाढला आहे.
एका प्रश्नावर उत्तर देताना चेअरमन मनोज कुमार म्हणाले की ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या मंत्रासह खादीला आणखी उंचीवर न्यायचे आहे. यासाठी खादी, स्वदेशी, मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांवर सातत्याने काम केले जाणार आहे. भारत विश्वगुरू बनण्यासाठी खादी संस्थांना कसे पुढे न्यावे, या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी सांगितले की खादी ग्रामोद्योगाशी देशभरातील तीन हजार खादी संस्था जोडलेल्या आहेत. यामार्फत पाच लाख लोकांना रोजगार मिळतो. त्यातील 80 टक्के महिला आहेत हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार देणारे हे एकमेव क्षेत्र आहे. आज खादी ग्रामोद्योग एकूण दोन कोटी लोकांना रोजगार प्रदान करत आहे. ग्रामीण भारतासाठी इतका मोठा उपक्रम क्वचितच पाहायला मिळतो.
कनॉट प्लेस येथील खादी भवनाच्या नूतनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर केव्हीआयसी चेअरमन म्हणाले की त्या इमारतीचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पुढील पाच महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.मनोज कुमार यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत खादी सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून उदयास आली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे ‘हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी’ आणि ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ यांना नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांच्या पुढाकारामुळे गेल्या 11 वर्षांत ‘खादी क्रांती’मुळे खादी आणि ग्रामोद्योगाचा व्यवसाय 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे. वार्तालापाच्या शेवटी चेअरमन मनोज कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी स्वदेशी उत्पादने खरेदी करावीत, ज्यामुळे ग्रामीण भागातील केव्हीआयसीशी जोडलेल्या लाखो कारागिरांना रोजगार व उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी