ताम्हिणी घाटात चारचाकी 500 फूट खोल दरीत कोसळली, सहा जणांचा मृत्यू
- दोन दिवसांपासून होते नाॅट रिचेबल रायगड, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर चारचाकी गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात सोमवारी रात्री झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आ
Rescue Team


- दोन दिवसांपासून होते नाॅट रिचेबल

रायगड, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर चारचाकी गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात सोमवारी रात्री झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. माहिती मिळाल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी आज, गुरुवारी याबाबत शोधकार्य सुरू आहे. सह्याद्रीच्या दाट अरण्यातून जाताना वळणावळणाचे रस्ते आणि अचानक खोल उतार हे ताम्हिणी घाटाचे वैशिष्ट्य आहे.

ताम्हिणी घाटामध्ये माणगाव महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि शोध पथकाच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहिम सुरू केली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध सुरू केल्यानंतर हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तरुणांचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात दाखवले आहे. रायगड ते पुणे दरम्यान एका चारचाकी वाहनातून सहा जण जात होते. त्यांचे वय अंदाजे 18 ते 24 वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. घाटात एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट 500 फूट खोल दरीत कोसळले. घटनेची वेळ रात्रीची असल्याने कोणालाही अपघाताची कल्पना तात्काळ आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील व्यक्तींशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. मोबाईलमधील शेवटचे लोकेशन तपासण्यात आले असता ताम्हिणी घाट परिसरातच जीपीएस सिग्नल थांबले असल्याचे दिसून आले. यानंतर शोधमोहीम तातडीने सुरू करण्यात आली. त्यानंतर बचाव पथकाला चार जणांचे मृतदेह सापडले असून दोन जण बेपत्ता होते, मात्र अधिक तपासात त्यांचेही मृतदेह प्राप्त झाले.

पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितलं की, अपघाताचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी. ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह दिसून आले आहेत. ते वर आणण्याचे काम सुरू आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. वाहनात आणखी प्रवासी होते का, याचा तपासही सुरू आहे.

तरुण पुण्यातील रहिवासी आहेत. मंगळवारी दिवसभर या तरुणांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे पुणे आणि माणगाव पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. पुण्यातील खडकवासला–उत्तम नगर येथील सहा पर्यटक मध्यरात्री कोकण पर्यटनासाठी काल रात्री निघाले होते, त्यावेळी हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. ताम्हिणी घाटात ही गाडी दरीत कोसळल्याचा कोणालाही पत्ता नव्हता. कठडा तुठल्याचे कळल्यानंतर येथे अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले. या कारचा नोंदणी क्रमांक एमएच 14 एचडब्यू 7575 असा आहे. रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर यात सहाही तरुणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande