देशात 4 नवीन कामगार संहिता लागू
केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्र सरकारने आज, शुक्रवारी देशभरातील कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून चार नवीन कामगार संहिता लागू केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे देशातील तब्बल 40 कोटी कामगारांना
भारत सरकार लोगो


केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्र सरकारने आज, शुक्रवारी देशभरातील कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून चार नवीन कामगार संहिता लागू केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे देशातील तब्बल 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा, सुरक्षित कामाचे वातावरण आणि वेळेवर किमान वेतन याची हमी मिळणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटरवर (एक्स) ही माहिती दिली.

आपल्या संदेशात मनसुख मांडविया म्हणाले की, नवीन संहितांमुळे सर्व कामगारांना वेळेवर वेतन, तरुणांसाठी नियुक्ती पत्रांची हमी, महिलांसाठी समान वेतन आणि आदर, तसेच व्यावसायिक सुरक्षा यासह सामाजिक सुरक्षा मिळणार आहे.केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 कामगार संहितांमध्ये वेतन संहिता (2019), औद्योगिक संबंध संहिता (2020), सामाजिक सुरक्षा संहिता (2020), व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता (ओएसएचडब्ल्यूसी-2020) यांचा समावेश आहे. ही फक्त सुधारणा नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगार कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. हे पाऊल आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे ठरेल असा विश्वास मांडविय यांनी व्यक्त केला.

नवीन कामगार संहितेतील महत्वाचे मुद्दे

सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी

तरुणांसाठी नियुक्ती पत्रांची हमी

महिलांना समान वेतन आणि आदराची हमी

सुमारे 40 कोटी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा हमी

कर्मचार्यांना एक वर्षानंतर ग्रॅच्युइटीची हमी

४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी वार्षिक मोफत आरोग्य तपासणीची हमी

ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतनाची हमी

धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी १०० टक्के आरोग्य सुरक्षेची हमी

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, कामगार बंधू - भगिनींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. स्वातंत्र्यानंतर कामगारांसाठी हा सर्वात मोठा निर्णय असून यामुळे देशातील कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षमता मिळेल. सामाजिक सुरक्षा, सुरक्षित कार्यस्थळ आणि वेळेवर वेतन सुनिश्चित करणाऱ्या या संहितांमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, उत्पादकता वाढेल आणि भारताचा आर्थिक विकास गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच या 4 नवीन कामगार संहितांमुळे कामगारांचे हक्क संरक्षण, महिला आणि तरुणांचे कल्याण, तसेच व्यवसाय सुलभता या सर्वांवर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande