


नागपूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम मंच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नागपूर मध्ये केले.
विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूने, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 16 त्या ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ऍग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सहकारिता राज्यमंत्री. डॉ. पंकज भोयर, एनडीडीबीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिनेश शाह प्रामुख्याने उपस्थित होते.
21 नोव्हेंबरपासून ते 24 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड वरील मैदानावर सुरु झाले असून सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत हे कृषीप्रदर्शन खुले राहणार असून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 5 आहे.
या उद्घाटन सत्राला संबोधित करताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की , प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये आता शेतामध्ये पाणी साचल्यास तसेच रानटी पिकामुळे होणाऱ्या नुकसानाचा देखील समावेश करण्यात आला आहे .केंद्र शासन नागपुरामध्ये 'क्लीन प्लांट सेंटर 'च्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगली रोपे उपलब्ध होण्यासाठी रोपवाटिका यांना अर्थसहाय्य करत आहे .मोठ्या रोपवाटिकांना 4 कोटी तर मध्यम आकाराच्या रोपवाटिकांना 2 कोटी अर्थसाहाय्य देऊन शेतकऱ्यांना रोगमुक्त रोपे या क्लीन प्लांट सेंटरच्या माध्यमातून वितरित केले जातील असे त्यांनी सांगितले .वैज्ञानिकांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची गरज असून 'लॅब टू लँड ' यासाठी केंद्र सरकारने कृषी वैज्ञानिकांना कृषी विस्तार उपक्रम राबवायला सांगत असल्याचे चौहान यांनी नमुद केले .शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की मशीन शेतकऱ्यांना घेता येतील अशा क्षमतेच्या बनवाव्यात .ज्या शेतकऱ्यांना अशा मशीन घेता येत नाही त्यांच्यासाठी हायरिंग सेंटरची सुविधा देखील निर्माण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्गदर्शन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास पाणी आणि खताचा पुरेपूर वापर तसेच बचत करून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवता येईल . संत्रा , तुर ऊस या पिकांना संभाव्य रोग आणि कीड व्यवस्थापनापासून हे तंत्रज्ञान लाभदायक ठरेल असे देखील गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले .शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून त्याचप्रमाणे रासायनिक खताचा वापर कमीत कमी करून मध्यस्थांना हटवून त्याच्या कृषीमालांचे विपणन केल्यास त्यांना लाभ होईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले .पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा किंवा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात जे दूध उत्पादन सरासरी 90 लाख लिटर प्रति दिवस असते ते संपूर्ण विदर्भाच्या 11 जिल्ह्यात केवळ 25 लाख लिटर आहे ही स्थिती बदलण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुपालन तसेच दुग्ध व्यवसाय जोडधंदाची कास धरणे आवश्यक आहे असे गडकरी यांनी आवर्जून सांगितले.मदर डेअरीच्या माध्यमातून जर काऊ फार्म तयार झाले तर विदर्भात दुग्ध क्रांती होईल.विदर्भातील दुग्ध उत्पादन आणि संत्रा उत्पादनामुळे नागपूरची संत्रा बर्फी सुद्धा जगभरात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की सलग पंधरा वर्षापासून सुरू असलेल्या ॲग्रविजन मध्ये मार्गदर्शन मिळवून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये तसेच पीक पद्धतीमध्ये बदल घडवून आणावेत.राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देखील त्यांनी दिली .संत्र्यांच्या रोपवाटिकेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल तसेच यासंदर्भात बैठकीसाठी सुद्धा त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आश्वासन दिले .
21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान दररोज कृषी शाळांचे आयोजन या कृषी प्रदर्शनामध्ये करण्यात आले आहे . ‘डेअरी-चारा व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रिया’ ‘तेलबिया अभियानाशी संबंधित मधमाशी पालना’वरील राष्ट्रीय परिषद ,कृषी क्षेत्रातील स्टार्टअप ‘ऊस लागवड, व्यवस्थापन व नवीन तंत्रज्ञान ‘फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन’ ,शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रज्ञान’, तसेच अन्नप्रक्रिया उद्योग या विषयावर देखील परिषद आयोजिण्यात आली आहे.
या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय हरियाणाचे मुख्यमंत्री नायक सिंग सैनी उपस्थित असतील.
अनेक खाजगी संस्थांसह आयआयटी खरगपूर, डॉ .पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पीडीकेव्ही अकोला यासारख्या शैक्षणिक संस्थांचादेखील सहभाग या प्रदर्शनात असून एमएसएमई आणि एग्रीकल्चर स्टार्टअप साठी देखील दालने आहेत.
या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी,विद्यार्थी नागरिक तसेच उद्योजक येत आहेत .
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule