
अवैध कोळसा उत्खनन प्रकरणी मोठी कारवाई
कोलकाता, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : अवैध कोळसा वाहतूक आणि साठवणुकीच्या विरोधात अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला आहे. यातंगर्गत ईडीने आज, शुक्रवारी पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये 40 हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. कोळसा माफियांच्या विरोधात ही मोहिम हाती घेण्यात आलीय.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, ईडीने पश्चिम बंगालातील दुर्गापूर, पुरुलिया, हावडा आणि कोलकाता येथील 24 ठिकाणी अवैध कोळसा खाण, बेकायदेशीर वाहतूक आणि साठवणूक याच्याशी संबंधित तपासणी सुरू केली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, नरेंद्र खरका, अनिल गोयल, युधिष्ठिर घोष, कृष्ण मुरारी कयाल आणि इतरांच्या ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे.
झारखंडमध्येही ईडीचे अधिकारी 18 ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. हे धाडसत्र कोळसा चोरी आणि तस्करीशी संबंधित अनेक मोठ्या प्रकरणांशी जोडलेले आहे. यामध्ये अनिल गोयल, संजय उद्योग, एल. बी. सिंह आणि अमर मंडल यांच्या प्रकरणांचा समावेश आहे. सर्व प्रकरणे मिळून कोळसा चोरीचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. या बेकायदेशीर कृत्यांमुळे सरकारला शेकडो कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी