
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळिकीच्या चर्चेमुळे कॉंग्रेसने मनसेविरोधाची भूमिका घेत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला असताना, मनसेने महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता फेटाळली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाविकास आघाडीचा भाग नाही आणि पक्षाचे सर्व निर्णय योग्य वेळी राज ठाकरे स्वतः घेतील. उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड किंवा शरद पवार कोण काय बोलतात याच्याशी मनसेला काहीही देणेघेणे नसल्याचे त्यांनी सांगितले.
देशपांडे यांनी राज्यातील सध्याच्या निवडणूक वातावरणावरही टीका केली. ही लोकशाहीला काळिमा फासणारी निवडणूक असून सत्ताधारी पक्ष दडपशाही, पैशाचे आमिष आणि दादागिरी करून निवडणूक लढवत आहे, असा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत भांडण सुरु असताना जनतेच्या प्रश्नांवर बोलायला कुणी तयार नसल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेतील भ्रष्टाचाराचा त्यांनी उघड केलेला मुद्दा दुर्लक्षितच राहिला असून केवळ नाराजीच्या बातम्या चर्चेत आहेत, असे देशपांडे म्हणाले.
नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आणि 'बूंद से गईं सो हौद से नहीं आती,' या म्हणीचा वापर करत सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना मान देण्याच्या जीआरवर बोलताना, मान जबरदस्तीने मिळवता येत नाही, तो लोकांच्या मनात तयार व्हावा लागतो, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारला टोला लगावला आहे.
कल्याण लोकल मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी या घटनेची चौकशी होण्याची मागणी केली. कोणत्याही तरुणाने आत्महत्या करणे ही अत्यंत वेदनादायक गोष्ट असून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मराठी तरुणावर झालेल्या मारहाणीचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही, आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहोत, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोबत न घेण्याच्या निर्णयावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, 'मारहाणीची भाषा करणारे आमच्या सोबत नको. समविचारीची भाषा करणाऱ्यांना सोबत घेऊन जाणार.' वर्षा गायकवाड यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबतच राहणार की मनसेसोबत युती करणार याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule