“मुख्यमंत्री पदावर राहीन, बजेट देखील सादर करीन” – सिद्धारमय्या
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चाललेला तणाव हळूहळू वाढत चालला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आज, शुक्रवारी सांगितले की ते पदावर राहतील आणि भविष्यात राज्याचा अर्थसंकल्प देखील सादर करतील. त्यांचे ह
सिद्धारमय्या  व डी.के. शिवकुमार संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चाललेला तणाव हळूहळू वाढत चालला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आज, शुक्रवारी सांगितले की ते पदावर राहतील आणि भविष्यात राज्याचा अर्थसंकल्प देखील सादर करतील. त्यांचे हे विधान सत्ताधारी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या जोरदार सत्ता संघर्षाच्या दरम्यान आले आहे, ज्यात डी.के. शिवकुमार गटाचे नेते पक्षश्रेष्ठींवर बदलासाठी दबाव टाकत आहेत.

याबाबत काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की किमान 15 आमदार आणि सुमारे एक डझन एमएलसी शिवकुमार यांना पुढील मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. शिवकुमार समर्थकांची ही मागणी 2023 मध्ये झालेल्या पावर-शेअरिंग करारावर आधारित आहे, ज्यात अडीच वर्ष (20 नोव्हेंबरपर्यंत) सिद्धारमय्यांच्या जागी शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याचे ठरले होते. ही मुदत आज संपली असून, यानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे.

ठरल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना सत्तेचे हस्तांतरण होईल असे गृहित धरून शिवकुमार यांचे भाऊ डी.के. सुरेश म्हणाले होते की सिद्धारमय्या कधीच आपल्याला वचनापासून मागे हटत नाहीत. त्यावर प्रतिक्रिया मुख्यमंत्री म्हणाले की, मी माझ्या विधानापासून कधी मागे हटलो नाही. निवडणुकीपूर्वी मी केलेल्या पाचही हमी मी पूर्ण केल्या आहेत. दरम्यान सत्ता हस्तांतरणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे मुख्यमंत्री मंत्री, आमदार आणि शिवकुमार यांना पालन करावे लागेल. पक्षातील उच्च नेतृत्त्वाचा निर्णय सर्वांनाच बंधनकारक असतो असे सिद्धारमय्या यांनी सांगितले.

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डी.के. शिवकुमार यांनी सांगितले की, गटबाजी करणे माझ्या रक्तात नाही. सर्व 140 आमदार माझे आहेत. मुख्यमंत्री यांनी ठरवले की ते सरकारमध्ये किंवा मंत्रिमंडळात फेरबदल करतील. त्यामुळे सर्व मंत्री बनण्यास उत्सुक आहेत. हे नैसर्गिक आहे की ते दिल्लीमध्ये नेतृत्त्वाशी भेटायला जातील. त्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहे. मी कोणालाही नेले नाही. त्यापैकी काही खरगे साहेबांना देखील भेटले आहेत. यात काही चुकीचे नाही. ही आमदारांची इच्छा असून त्यांनी कोणालाही बोलावलेले नाही. काँग्रेसचे आमदार स्वतःच्या इच्छेने जात आहेत आणि आपली उपस्थिती दाखवत आहेत. ते दाखवू इच्छित आहेत की ते पुढे आहेत, काम करू शकतात आणि त्यांना जबाबदारी हवी असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.

तसेच सर्व 140 आमदार मंत्री बनण्यास पात्र आहेत. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की ते 5 वर्षे पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही सर्व त्यांच्यासोबत काम करू असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande