
रायगड, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। नशामुक्त नवी मुंबई अभियानाच्या अंतर्गत मध्यवर्ती गुन्हे शाखेने कळंबोली परिसरात मोठी कारवाई करत तब्बल साडेपाच किलो गांजा जप्त केला आहे. रोडपाली लिंक रोडवरील डी. डी. ढाब्याजवळ काही जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची मिळालेली विश्वसनीय माहिती अंमलदार ओमकार भालेराव यांना मिळताच पथकाने तातडीने सापळा रचून कारवाई केली. या धाडीत सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सर्व विभागांना अमली पदार्थविरोधी कारवाईच्या कडक सूचना दिल्यानंतर ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
सहाय्यक निरीक्षक महेश जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक मंगेश वाट, पोलिस अमलदार नितीन जगताप, दिलीप ठाकूर आणि ओमकार भालेराव यांनी रोडपाली लिंक रोडवरील डी. डी. ढाब्याजवळ निगराणी ठेवून आरोपींना रंगेहाथ पकडले. आरोपींकडून साडेपाच किलो गांजा, मोबाईल फोन तसेच चारचाकी वाहन असा एकूण 9 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींवर अमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या कारवाईमुळे कळंबोली परिसरातील अंमली पदार्थांच्या हालचालींना मोठा आळा बसला असून नशामुक्त नवी मुंबई अभियानाला गती मिळाल्याचे पोलीस दलाने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके