
धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद साहिब हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता नानकी देवी असे होते. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते; पण युद्धभूमीवरील त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना तेग बहादुर म्हणजे ‘तलवारीसारखा धैर्यवान’ असे नाव दिले. बालपणापासूनच त्यांच्यात शौर्य, नम्रता आणि अध्यात्मिक चिंतन यांचा सुंदर संगम होता. त्यांनी सांसारिक किर्तीपेक्षा आत्मज्ञान आणि मानवसेवा हेच जीवनाचे खरे ध्येय मानले होते.
शीख गुरू परंपरा अडचणीत आली असताना गुरू शोधण्याचे काम श्री बाबा मखान शाह लबाना यांनी बाबा बकाला (अमृतसर) येथे याठिकाणी केले. ऐतिहासिक माहितीनुसार श्री बाबा माखनशहा लबाना यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजींना ओळखून ‘गुरु लाधो रे गुरू लाधो रे’ अशी घोषणा केली, आणि त्या क्षणापासून लबाना समाजाचे नाव शीख इतिहासात अजरामर झाले.
१६६४ मध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे शीख धर्माचे नववे गुरु झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण शांतता, करुणा आणि आत्मनिष्ठा होती. त्यांनी धर्माचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, धर्म म्हणजे आग्रह नव्हे, तर दुसऱ्याच्या श्रद्धेचा सन्मान करणे होय. त्यांनी भारतभर प्रवास करून समाजात मानवता, समता आणि सहिष्णुतेचे बीज रोवले. श्री आनंदपूर साहिब हे त्यांनी स्थापन केलेले पवित्र ठिकाण असून आजही ते शीख धर्माचे केंद्रस्थान आहे.
त्या काळात जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. या संकटाच्या वेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ते म्हणाले होते, ‘जर माझ्या बलिदानामुळे या निरपराधांच्या श्रद्धेचे रक्षण होणार असेल, तर तेच माझे सर्वोच्च धर्मकर्म ठरेल.’ हे शब्द केवळ त्यागाचे नव्हते, तर संपूर्ण मानवतेच्या रक्षणाची घोषणा करणारे होते.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना आग्रा येथे कैद करून दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली. पण त्यांनी तत्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. १६७५ मध्ये चांदणी चौक दिल्ली शीशगंज येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या पाठीमागे केवळ शीख अनुयायी नव्हते; तर त्यांच्या सोबत अनेक समाज उभे होते. विशेषतः सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात आपले मोलाचे योगदान दिले. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला गुरूजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरूनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात.
लबाना, बंजारा, सिखलीकर समाजांनी श्री गुरू तेग बहादुर साहिबजींचा धर्माचे रक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण हा शिकवणीचा संदेश दूरवर पोहोचवला.
त्यांच्या व्यापारी व भ्रमणशील जीवनशैलीमुळे भारताच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आजही संपूर्ण देशामध्ये या प्रदेशांमध्ये या समाजाचे लोक भक्ती, सेवा आणि साहसाची परंपरा जिवंत ठेवून आहेत.
श्री गुरु तेग बहादुरजींनी शिकवले की धर्म म्हणजे प्रेम, समता आणि सेवा. ते सांगतात की, धैर्य तलवारीत नसते, ते सत्यात असते.
त्यांनी ‘‘न को बैरी, न ही बेगाना, सगल संग हम को बन आई’’ या गुरू वाणीच्या रचनेत त्यांनी सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे. याचा अर्थ ‘माझ्यासाठी कोणीही शत्रू नाही, परका नाही कारण सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे.’
त्यांची ५७ भक्तिगीते आणि ५७ सलोक (उपदेशपर पदे) गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येक ओळ सत्य, संयम आणि मानवतेचा संदेश देते. त्यांचा विचार समाजाला नवजीवन देतो. ते सांगतात की, धर्म ही मानवतेतील भिंत नसून पूल आहे; श्रद्धा हा संघर्ष नसून सहजीवनाचा प्रवाह आहे. त्यांनी आपल्या बलिदानाने धर्माचे रक्षण म्हणजे इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करण्याचा संदेश जनमानसात पोहोचवला. त्यांच्या बलिदानाने मानवाधिकारांचे मूलतत्व अधोरेखित झाले आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव हे विठोबाचे परम भक्त होते. त्यांचे आध्यात्मिक कार्य पंजाब पर्यंत पोहचले आणि तेथील लोकांसाठी ते ‘भगत’ बनले. संत नामदेवांनी शीख धर्म प्रसारात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांना भगत नामदेव म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या पवित्र श्री गुरू ग्रंथ साहिब या शीख पवित्र धर्मग्रंथात संत नामदेव यांची ६१ पदे समाविष्ट आहेत. जी त्यांच्या एकेश्वरवाद, समानता आणि भक्तीचे प्रतिबिंब आहे. संत नामदेव यांनी आपल्या भक्तीच्या शिकवणुकीच्या माध्यमातून शीख धर्मावर खोलवर प्रभाव टाकला आहे. पंजाबमधील घुमान (गुरूदासपूर) या गावी संत नामदेवांचे मोठे स्थान आहे. तेथील लोक त्यांना बाबाजी म्हणून ओळखतात. अशाप्रकारे संत नामदेव यांनी महाराष्ट्र आणि पंजाब यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडली.
देवा पापछळे कांपते मेदिनी
दैसाचिने भारे वाटली अवनी
अधर्म प्रवर्तला माहितळी
ऐसे पापे कळी थोर आला...
असे म्हणत संत नामदेवांनी देशाटन केले. उत्तर भारतात भक्तीमार्गाचा प्रसार केला. या त्यांच्या प्रवासात शेवटी ते पंजाबात २० वर्ष स्थिरावले. याठिकाणी त्यांना पंजाबात बोहरदास, जल्ला, लध्दा, कंसो असे अनेक शिष्य मिळाले. ज्याठिकाणी संत नामदेव तप करायचे, त्याला ‘तपियाना साहिब’ म्हणून ओळखले जाते.
शीख धर्माचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड ही असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, ‘सब सिक्खन को हुकम है गुरू मान्यो ग्रंथ साहिब’ असा उपदेश दिला होता. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने (नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड) या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत राज्यभर प्रचार, प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे संकेतस्थळ आणि गुरु तेग बहादुरजींच्या बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान झाले. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी असे विविध समुदाय या प्रसंगी एकत्र येऊन हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचा संदेश घराघरांत आणि जनमाणसांत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.
आजही त्यांच्या शहिदीचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत आहे. आणि जोपर्यंत या भूमीवर मानवतेवर प्रेम करणारा एकही मनुष्य आहे, तोपर्यंत ‘हिंद दी चादर’ अमर राहील.
– रामेश्वर नाईक
समन्वयक
हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम समिती
महाराष्ट्र राज्य.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी