गुरु तेग बहादूर : मानवतेचे रक्षक
भारतीय संस्कृतीचा आणि मानवतेच्या इतिहासाचा अभ्यास करताना काही व्यक्तिमत्त्वे अशी भेटतात की ज्यांचे जीवन, विचार, आणि बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरते. अशाच तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे
गुरु तेग बहादूर


भारतीय संस्कृतीचा आणि मानवतेच्या इतिहासाचा अभ्यास करताना काही व्यक्तिमत्त्वे अशी भेटतात की ज्यांचे जीवन, विचार, आणि बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरते. अशाच तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे शीख धर्माचे नववे गुरु ‘गुरु तेग बहादूर’ होते. २४ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारत देश त्यांच्या बलिदानाची, त्यांच्या मूल्यांची आणि त्यांच्या अद्वितीय मानवतावादी विचारांची स्मृती जागवतो. हा दिवस केवळ एका धार्मिक गुरूच्या हौतात्म्याचा दिवस नाही, तर मानवी हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि आत्मगौरवासाठी प्राणार्पण करणाऱ्या महापुरुषाचा वैश्विक स्मरणदिन आहे.

गुरु तेग बहादूर यांचे संपूर्ण जीवन हे सामाजिक बांधिलकी, समता, दीनदुबळ्यांचे रक्षण, शांतता, अध्यात्म आणि संघर्षातील धैर्याचे प्रतीक आहे. इतिहासात अनेक योद्धे लढले, अनेक सम्राटांनी सत्ता मिळवली, अनेक विद्वानांनी ज्ञान दिले, परंतु एखाद्याच्या धर्म, संस्कृती आणि श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीवदान देणारी व्यक्ती विरळच आढळते. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हा जगाच्या इतिहासात अभूतपूर्व प्रसंग आहे.

गुरु तेग बहादूर यांच्या काळातील भारत देश हा राजकीय संघर्ष, धार्मिक अंधश्रद्धा, जातिभेद, आणि अत्याचाराच्या छायांनी वेढलेले होता. मुगल सत्तेचा प्रभाव वाढत होता, आणि औरंगजेब धर्मांतराच्या धोरणातून इस्लामीकरणाचा प्रसार करू इच्छित होता. हिंदू, जैन, सूफी, बौद्ध आणि अनेक समुदायांवर धर्मांतराचा दबाव वाढत होता. काश्मीरच्या विद्वान पंडितांनी आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी दिल्ली नव्हे, तर पंजाब गाठले आणि तेथे त्यांनी आशेचा किरण म्हणजे गुरु तेग बहादूर यांना भेटले. त्यांच्या वेदनादायी कथा ऐकून गुरुजींनी जो निर्णय घेतला, तो इतिहासातील सर्वात मोठा न्याय, स्वातंत्र्य आणि मानवतेचे रक्षण करणारा निर्णय ठरला.

गुरु तेग बहादूर यांनी समतेवर आधारित समाज बांधण्यासाठी श्रद्धेची शक्ती, क्षमेचे दर्शन आणि न्यायाची भावना जोपासली. त्यांच्या शिकवणींमध्ये “भीतीवर मात” हे केंद्रस्थानी होते. स्वतःच्या ग्रंथांत त्यांनी लिहिले आहे की “जो डरता नाही, जो दुसऱ्याला घाबरवत नाही, तोच खरा ज्ञानी आणि मुक्त आहे.” त्यांचा संदेश स्पष्ट होता की “मनुष्याने मुक्त जगावे. त्याची श्रद्धा, अस्तित्व आणि स्वाभिमानावर कुणाचाही अंमल चालू नये.” त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू समाजाचा सर्वांगीण विकास हा होता. अनेक स्थळी त्यांनी गुरुद्वारे स्थापन करून ‘लंगर’ या परंपरेला अधिक बळ दिले. लंगर ही केवळ भूक भागविण्याची पद्धत नव्हती, तर समता, बंधुता आणि जातिनिरपेक्ष सामाजिक एकतेचा प्रयोग होता. त्या काळातील जातिव्यवस्थेच्या कठोरतेला धक्का देणारी ही सामाजिक क्रांतीच होती. एका थाळीत श्रीमंत-गरीब, हिंदू-मुस्लिम, ब्राह्मण-शूद्र, राजा-प्रजा सगळ्यांनी बसून भोजन करणे हा एक मौन सामाजिक संदेश होता. या संदेशामधून “मानवात भेद नाही.” हे स्पष्ट होत होते.

गुरु तेग बहादूर यांची समाजकार्याची दृष्टी केवळ धार्मिक मर्यादांपुरती नव्हती. त्यांनी अनेक गावांत विहिरी, तलाव, रस्ते, विश्रामगृहे आणि आश्रयधामे बांधली. त्यांच्या शिकवणीत मानवी समतोल, मानसिक शांती आणि सामाजिक जबाबदारी या तीन स्तंभांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी लोकांना ध्यान, संयम आणि निष्ठेने जीवन जगण्याची प्रेरणा दिली.

त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ अध्यात्मिक नव्हते; ते एक शूर योद्धेही होते. त्यांच्या बालपणातच ‘गुरु हरगोबिंद साहिब’ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शौर्य, अस्त्र-शस्त्र प्रशिक्षण आणि राष्ट्रसेवेचे धडे घेतले. त्यामुळेच, जेव्हा स्वातंत्र्यावर गदा येत होती, तेव्हा त्यांनी मौन साधना नाही केली, तर थेट अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला. आणि मग आला इतिहासातील अंधाऱ्या अत्याचारांचा क्षण. जेव्हा काश्मीरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी त्यांनी स्वतःचा जीव अर्पण करण्याचे ठरवले. त्यांनी औरंगजेबाला स्पष्ट संदेश दिला होता की, “जर मी धर्मांतर केले तर लाखो हिंदू धर्मांतर करतील, आणि जर मी प्राण दिले तर भविष्यात कोणीही धर्मावर अत्याचार करण्याचे धाडस करणार नाही.”

दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या कारागृहात त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, पण त्यांनी धर्म, न्याय आणि स्वातंत्र्य यांची बाजू सोडली नाही. २४ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आज त्या ठिकाणी उभे असलेले ‘गुरुद्वारा शीश गंज साहिब’ हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते ‘मानवी हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे स्मारक आहे. त्यांच्या बलिदानाचा प्रभाव भारतीय समाजात आणि जगभरातील मानवतावादी विचारांतून दिसून येतो. भारताच्या संविधानात अंतर्भूत असलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराचा बीजकण गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानातूनच उगवलेला दिसतो. ते जगाला शिकवून गेले की “स्वत:साठी जगणारा सामान्य असतो, परंतु दुसऱ्याच्या स्वाभिमानासाठी प्राण देणारा अमर असतो.”

आजच्या काळात गुरु तेग बहादूर यांचे जीवन आपल्याला काही महत्त्वपूर्ण मूल्ये सांगते, ते म्हणजे समाजाला समता हवी, भीती नव्हे; संवाद हवा, संघर्ष नव्हे; मानवता हवी, हिंसा नव्हे; मन मुक्त हवे, शरीर नाही.

धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अजूनही जगात हिंसा घडते. जात, धर्म, वंश, भाषा यावरून अजूनही संघर्ष होतात. अशा काळात गुरु तेग बहादूर यांचे बलिदान आपल्याला आठवण करून देते की ‘मानवता सर्वात श्रेष्ठ धर्म आहे.’ त्यांचे बलिदान हा केवळ इतिहासातील प्रसंग नाही तर तो न्याय, स्वातंत्र्य, विविधता आणि मानवतेच्या स्वीकाराचा एक जिवंत संदेश आहे.

आज, त्यांच्या शहीद दिनानिमित्त भारतासह जगभरातील समाज एक प्रश्न विचारतो की आपण मानवतेचे रक्षण करण्यासाठी कितपत तयार आहोत? गुरु तेग बहादूर आपल्याला शिकवतात की समाजातील दुर्बल, शोषित, पीडित वर्गासाठी आवाज उठवणे ही केवळ जबाबदारी नाही तर ते एक मानवी कर्तव्य आहे. त्यांच्या जीवनाने दाखवून दिले की “धर्म म्हणजे इतरांचा धर्म नष्ट करणे नव्हे, तर प्रत्येकाच्या श्रद्धेचा सन्मान करणे होय.” त्यांचे स्मरण केवळ धार्मिक नाही तर ते राष्ट्रीय, सामाजिक आणि मानवतावादी वारसा आहे. आजचा दिवस हा केवळ त्यांच्या शहादतीचा स्मरणदिन नाही, तर त्यांच्या विचारांचे पुनरुज्जीवन करण्याचा दिवस आहे.

गुरु तेग बहादूर यांचे जीवन हे जळणारे दीप आहे ‘जे अंधारातही प्रकाश देते, भीतीतही आत्मविश्वास देते, आणि संघर्षातही सत्य न सोडण्याची प्रेरणा देते. या महान विभूतीला विनम्र अभिवादन.

डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक) ९९६०१०३५८२

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande