
गुवाहाटी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय संघावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभवाचे सावट आहे. गुवाहाटी कसोटीत भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीतील कामगिरी अतिशय खराब झाली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ४८९ धावांच्या प्रत्युत्तरात, भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी २०१ धावांवर आटोपला. दिवसाच्या अखेरीस, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात बिनबाद २६ धावा केल्या होत्या. त्यांची एकूण आघाडी ३१४ धावांवर पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रायन रिकल्टन १३ धावांवर आणि एडेन मार्कराम १२ धावांवर नाबाद होते.
केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताला पहिल्या डावात चांगली सुरुवात दिली होती. पण ही भागीदारी तुटल्यानंतर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारत दोन सामन्यांच्या मालिकेत आधीच ०-१ असा पिछाडीवर आहे आणि मालिका गमावण्याचा धोका आहे. संघाची फलंदाजी निराशाजनक होती आणि त्यांना फॉलो-ऑनही टाळता आला नाही. त्यांना २८९ धावा करायच्या होत्या, पण ते शक्य झाले नाही. पण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने फॉलो-ऑन लागू न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २८८ धावांची आघाडी घेतली.
पहिल्या डावात भारताला बाद केल्यानंतर, मार्कराम आणि रिकेल्टनने दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात दिली. भारतीय गोलंदाजांना आतापर्यंत एकही यश मिळालेले नाही. या परिस्थितीत, भारत आता किमान सामना बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. पण मालिका वाचवण्यासाठी विजय हाच त्यांच्यासमोप एकमेव पर्याय आहे.
भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ५८ धावा केल्या, तर सुंदरने ४८ धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. केएल राहुल २२ धावा करून बाद झाला, साई सुदर्शन १५ धावा करून, कर्णधार ऋषभ पंत ७ धावा करून, रवींद्र जडेजा ६ धावा करून आणि नितीश रेड्डी १० धावा करून बाद झाला. 6५ धावांवर एक विकेट गमावल्यानंतर भारताने १२२ धावांपर्यंत पोहोचताना ७ विकेट गमावल्या. ध्रुव जुरेलला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर सुंदरने कुलदीप यादवसोबत ७२ धावांची भागीदारी केली. सुंदर बाद होताच भारताचा पहिला डाव २०१ धावांवर आटोपला. कुलदीप १९ धावा करून बाद झाला आणि बुमराह ५ धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक जानसेनने ६ विकेट्स घेतल्या. तर सायमन हार्मरने ३ विकेट्स घेतल्या. केशव महाराजला एका फंलदाजला बाद करण्यात यश आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे