
बंगळुरु, 25 नोव्हेंबर (हिं.स.) पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका २० संघांच्या या जागतिक स्पर्धेचे आयोजन करतील. भारतीय संघ आपलं टायटल डिफेंड करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकची ट्रॉफी उंचावली होती. टी-२० विश्वचषकला ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चे वेळापत्रक प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमात आयसीसी अध्यक्ष जय शाह, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, २०२४ मध्ये भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सध्याचा भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष मिथुन मन्हास, सचिव देवजीत सैकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचा समावेश होता.
आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले की, २०२६ चा टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंकेतील आठ ठिकाणी होणार आहे. भारत पाच ठिकाणी सामने महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, २०२४ मध्ये भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सध्याचा भारतीय टी-२० आयोजित करेल, तर श्रीलंका या जागतिक स्पर्धेसाठी तीन ठिकाणी सामने आयोजित करेल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद भारतात सामने आयोजित करतील. कोलंबोचे आर. प्रेमदासा आणि एस. स्पोर्ट्स क्लब सामने आयोजित करतील, तर कॅंडीचे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम देखील एक सामना आयोजित करणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे, टी-२० विश्वचषकात २० संघ सहभागी होत आहेत. या संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे, प्रत्येक गटात पाच संघ आहेत. गट टप्प्यानंतर सुपर आठ टप्पा होईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ या टप्प्यासाठी पात्र ठरतील. सुपर आठ टप्प्यात आठ संघांना दोन गटांमध्ये विभागले जाईल, प्रत्येक गटात चार संघ असतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचतील. या जागतिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांमध्ये भारत, नामिबिया, नेदरलँड्स, पाकिस्तान, अमेरिका, बांगलादेश, इटली, इंग्लंड, नेपाळ, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, ओमान, श्रीलंका, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे.
भारत ७ फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. या सामन्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत भारत आणि नामिबिया यांच्यात सामना होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयसीसी, बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील करारानुसार, २०२७ पर्यंत भारत आणि पाकिस्तानमधील सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. म्हणूनच कोलंबो दोन्ही संघांमधील सामना आयोजित करणार आहे. भारत १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये आपला शेवटचा साखळी फेरीचा सामना खेळेल.
भारत टी२० विश्वचषकाचा दोन वेळा विजेता आहे. २००७ मध्ये झालेल्या या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला पराभत करत पहिल्या-वहिल्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. तर २०२४ मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता. भारताव्यतिरिक्त वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनेही दोनदा या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली आहे. आतापर्यंत एकूण सहा संघ या स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. २००७ मध्ये भारत, २००९ मध्ये पाकिस्तान, २०१० मध्ये इंग्लंड, २०१२ मध्ये वेस्ट इंडिज, २०१४ मध्ये श्रीलंका, २०१६ मध्ये वेस्ट इंडिज, २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया, २०२२ मध्ये इंग्लंड आणि २०२४ मध्ये भारत या स्पर्धेचे विजेते ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे