
इपोह (मलेशिया), २३ नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय पुरुष हॉकी संघाने सुलतान अझलन शाह चषक २०२५ ची शानदार सुरुवात केली. भारताने कोरियाचा १-० असा पराभव केला. पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी मोहम्मद राहिलने सामन्यातील एकमेव गोल (१५') केला. आणि त्याचा हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.
भारताने सामन्याची आक्रमक सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काही मिनिटांत चेंडूवर उत्कृष्ट नियंत्रण ठेवले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाने बरोबरी साधण्याचे प्रयत्न तीव्र केले आणि प्रतिआक्रमणात काही संधी निर्माण केल्या, परंतु गोलकीपर मोहित एचएसच्या शानदार बचावामुळे भारताची आघाडी अबाधित राहिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दुसरा गोल करण्याचा प्रयत्न केला पण पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवू शकला नाही. दरम्यान, पवननेही बचावात महत्त्वाची भूमिका बजावली .शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने वेग वाढवला आणि सामन्यावरील नियंत्रण राखले. कोरियन गोलकीपर किम जे-हानने काही महत्त्वाचे बचाव केले, ज्यात अभिषेकचा जवळून केलेला बचाव समाविष्ट होता. कोरियाने शेवटच्या मिनिटात पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु मोहित एचएसने पुन्हा एकदा शानदार बचाव करून भारताचा विजय निश्चित केला.
--------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे