
जळगाव, 24 नोव्हेंबर (हिं.स.) निर्भया फाउंडेशनतर्फे मनोज बर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील कराटेपटूंनी उत्तुंग यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून तब्बल 500 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.या भव्य स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काता आणि कुमिते (फाईट) या दोन्ही प्रकारांत झालेल्या स्पर्धांमध्ये जळगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. अनेक विद्यार्थ्यांनी गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ पदकांची कमाई करत पदकतालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याचबरोबर जिल्ह्याने द्वितीय पारितोषिक पटकावून आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला. या यशामागे प्रशिक्षकांचे अथक परिश्रम आणि मार्गदर्शन हेच मोठे बळ ठरले. मुख्य प्रशिक्षक अजय काशीद सर, दिगंबर महाजन सर, राजेश इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना सक्षम प्रशिक्षण मिळाले. तसेच पूर्वा सोनवणे, वैभवी चौधरी, सृष्टी वानखेडे, अनिरुद्ध अहिरे, आरुष कोळी, यश वानखेडे, विवेक पाटील, राज पगारे, सोनल येवले या सहकारी प्रशिक्षकांनीही प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देत महत्त्वाची भूमिका बजावली.स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. जळगावच्या कराटे खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, आत्मविश्वास आणि शिस्त यामुळे जिल्ह्याच्या खेळजगताचा आणखी एक शानदार ठसा उमटला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर