
नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत नाशिकच्या युथ चॅम्पियन फुटबॉल क्लब(वायसीएफसी)ने सीएचएमई भोंसला करंडक पटकावला. विजेत्या संघाला एक लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. उपविजेत्या औरंगाबादच्या आर.के.क्लब संघास ७५ हजार तर नाशिकच्याच एसटू गांधीनगर संघास ५० हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात वायसीएफसी संघाने नाशिकच्याच एसटू गांधीनगर संघावर मात करत अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या सामन्यात आर.के.औरंगाबाद संघाने नुसा संघावर सहज मात करत विजय संपादन केला. वायसीएफसी विरूध्द आर.के.क्लब औरंगाबाद हे दोन्ही संघ नावाजलेले असल्याने अंतिम सामना चुरशीचा होईल असे वाटले होते, मात्र ही अपेक्षा फोल ठरली, एकतर्फी झालेल्या या सामन्यात वायसीएफसी संघाने सुरवातीपासूनच आपले वर्चस्व ठेवत १-० असा विजय नोंदवत विजेतेपद पटकावले.
वायसीएफसी संघाकडून बहादूर याने डोक्याने चेंडू टोलवत एकमेव गोल केला. या संघाच्या के.प्रतिक,शुभम खरात यांनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्या,उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाच्या संघाना संस्थेचे कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
यावेळी स्पोर्टस् कमिटीचे चेअरमन सुयोग शहा,भोसला स्कूलचे चेअरमन आनंद देशपांडे, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनिरूध्द धर्माधिकारी,अर्जुन टिळे, रविंद्र नाईक आदी उपस्थित होते. अँड.भिडे,देशपांडे यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत क्षितीज तांबे,नरेश सिंह(दोघेही मुंबई),मोहसिन शेख,शहाबाज खान(दोघेही धुळे) यांनी पंच म्हणून काम पाहिले. सनी राय हे स्पर्धा आयुक्त होते.क्रीडाशिक्षक केतन जाधव,रोहित गर्गे यांनी निवेदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV