
मुंबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेइचा ३५-२८ असा पराभव करून भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावले. भारतीय महिला खेळाडूंनी चिकाटी, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर जगासमोर भारतीय स्त्रीशक्तीचे विराट सामर्थ्य अधोरेखित केले आहे. हा विजय केवळ क्रीडाक्षेत्रातील पराक्रम नसून देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय महिलांची विक्रमी कामगिरी नव्या भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी असून, त्यांच्या खिलाडूवृत्तीसह कठोर परिश्रमाला मनापासून सलाम करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन केले.
आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, भारतीय महिला कबड्डी संघाने दाखवलेली जिद्द, तंत्र आणि संघभावना प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. संजू देवी आणि उपकर्णधार पुष्पा यांच्या निर्णायक चढायांमुळे अंतिम फेरीत भारताने आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. प्रशिक्षक तेजस्विनी बाई यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पुन्हा एकदा जागतिक कबड्डीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
गेल्या महिन्याभरात भारतीय महिलांनी साध्य केलेल्या तीन विश्वविजयांचा विशेष उल्लेख करत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, देशातील महिला क्रीडा क्षेत्र अभूतपूर्व उंची गाठत आहे. सर्वप्रथम महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून आयसीसी महिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबोमध्ये झालेला पहिलाच अंध टी-२० विश्वचषक जिंकला आणि आता महिला कबड्डी विश्वचषकातही भारताने विजेतेपद पटकावले. फक्त महिनाभरात भारताच्या मुलींनी मिळवलेल्या या तीन विश्वविजयांनी संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. भारतीय महिला क्रीडापटूंच्या कामगिरीचा हा सुवर्णकाळ सुरू झाला असून भारतीय महिलांचा विजयरथ कोणी रोखू शकत नाही. देशातील प्रत्येक मुलीसह खेळाडूंसाठी हा प्रेरणादायी क्षण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भारतीय महिला कबड्डी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी तसेच खेळाडूंच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर