
जळगाव,, 25 नोव्हेंबर (हिं.स.) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते तर समारोप २८ नोव्हेंबर २०२५रोजी होणार आहे. या स्पर्धांमध्ये प्रकल्पातील ३४ अनुदानित व १७शासकीय अशा ५१ आश्रमशाळांमधून केंद्रस्तरीय निवडीनंतर एकूण १३९८ विद्यार्थी सहभागी होत आहेत.
वैयक्तिक व सांघिक असे विविध क्रीडा प्रकार यात समाविष्ट आहेत. कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपआयुक्त दिनकर पावरा, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी स्वागत, आरोग्य, भोजन आदी विविध समित्या गठित करण्यात आल्या असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर