
अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती शहर गुन्हे शाखेने शेतीसाठी उपयुक्त ट्रॅक्टर, टॉली, मोटारसायकल तसेच मालवाहू वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील फरार आरोपीला ताब्यात घेऊन तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी भातकुली पोलीस ठाण्यात फिर्यादी सदानंद पांडूरंग बोचे (वय ३९, रा. गजानन नगर, भातकुली) यांनी तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या घरासमोर उभा ठेवलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या तक्रारीवरून गुन्हा क्र. २२५/२०२५, कलम ३०३(२) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास अमरावती शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान यापूर्वीच चार आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आली होती, मात्र टोळीतील एक आरोपी फरार होता. चौकशीत इतर आरोपींनी सांगितले की फरार आरोपीकडे बजाज प्लॅटीना आणि होंडा स्प्लेंडर या दोन मोटारसायकली आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे फरार आरोपी वैभव उर्फ छकूला बाबूजी आठवले (वय २५, रा. कपीलेश्वर, ता. दहीहांडा, जि. अकोला) याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल ट्रॅक्टर, मोटारसायकली व इतर शेती अवजारे मिळून एकूण किंमत सुमारे ७ लाख रुपये जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी