
जळगाव , 3 नोव्हेंबर (हिं.स.) अवैध गांजाची वाहतूक करताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी एका पुरुषासह तीन महिलांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून ३ लाख १९ हजार रुपये किमतीचा १४ किलो ५१८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. सत्रासेन-लासूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. यादरम्यान नाटेश्वर मंदिराजवळ चार संशयितांना थांबवून त्यांच्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून गांजा मिळून आला.अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये जतिन बबन जावळे (२२, कांदिवली-मुंबई), संताबाई मनोहर गवारे (७०), शांताबाई पंडरी सुमरपल्ली (७२) आणि राधाबाई लक्ष्मणराव सोनवणे (७८, सर्व रा. भिमनगर, परभणी). त्यांच्याकडून १४ किलो ५१८ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन आणि १०२० रुपये रोख असा एकूण ३ लाख ३६ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेचे आणि अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाने ही कारवाई पार पाडण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर