जळगावात फायनान्स कंपनीतून मृताच्या नावाने ८.६० लाखांचे कर्ज काढून फसवणूक
जळगाव, 3 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या नामांकित फायनान्स कंपनीतून मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी
जळगावात फायनान्स कंपनीतून मृताच्या नावाने ८.६० लाखांचे कर्ज काढून फसवणूक


जळगाव, 3 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या नामांकित फायनान्स कंपनीतून मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीनुसार तिघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीचे एरिया बिझनेस मॅनेजर पुष्कर उमाकांत वारके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीतील कर्मचारी अमोल रमेश भावसार (रा. काशीबाई उखाजी शाळेमागे, बाबूरावनगर) याने मनीष राजेश रायचंदे (रा. शिरसोली) आणि धनंजय पांडुरंग चौधरी (रा. निवृत्तीनगर) यांच्यासोबत संगनमत करून हा प्रकार रचला. तिघांनी मिळून मृत भिका ओमकार पाटील यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर खोट्या सह्या केल्या आणि कंपनीच्या अजिंठा रोडवरील पगारिया चेंबर येथील कार्यालयातून ८.६० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. ही फसवणुकीची घटना १० फेब्रुवारी २०२४ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे.फायनान्स कंपनीच्या अंतर्गत तपासादरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. तक्रारीनुसार तिघांविरोधात विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande