तेलंगणामध्ये भीषण अपघात; बस-ट्रक धडकेत २० जणांचा मृत्यू
- पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर हैदराबाद, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात आज, सोमवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. खडीने भरलेल्या लॉरीनं तंदूर डेपोहून येणाऱ्या टीजीएसआरटीसी बसला जोरदार धडक दिली. चेवेल्ला मंडळातील मिरजागुड
bus collides gravel laden truck telangana highway


bus collides gravel laden truck telangana highway


bus collides gravel laden truck telangana highway


- पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर

हैदराबाद, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात आज, सोमवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. खडीने भरलेल्या लॉरीनं तंदूर डेपोहून येणाऱ्या टीजीएसआरटीसी बसला जोरदार धडक दिली. चेवेल्ला मंडळातील मिरजागुडा परिसरात घडलेल्या या अपघातात तब्बल २० जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, तंदूर येथून हैदराबादकडे येणाऱ्या बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. बांधकामासाठी खडी वाहून नेणारा ट्रक चुकीच्या दिशेने येऊन बसवर आदळला. या धडकेनंतर ट्रकमधील मोठ्या प्रमाणात खडी बसवर कोसळली आणि अनेक प्रवासी त्याखाली गाडले गेले. या भीषण घटनेत बसचालक, ट्रकचालक, दहा महिला आणि एक १० महिन्याचे बालक यांचा मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर परिसरात भीषण दृश्य निर्माण झाले. दगड आणि लोखंडी पत्र्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले प्रवासी मदतीसाठी किंचाळत होते. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी तीन जेसीबींचा वापर करण्यात आला. अडकलेल्या जखमींना चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातामुळे हैदराबाद-विजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. चेवेल्ला-विकाराबाद मार्गावरही अनेक वाहने अडकली असून पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत जाहीर

तेलंगणामधील भीषण रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनीही दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुःखद रस्ते अपघातातील बळींच्या कुटुंबियांना तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, जखमींना ५०,००० रुपये मिळतील.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर लिहिले की, पंतप्रधान मोदी म्हणाले, तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी खूप दुःखी आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसह माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून २ लाख रुपये दिले जातील आणि जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींना उत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. वाहतूक मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी आणि टीजीएसआरटीसीचे एमडी नागी रेड्डी यांच्याशी संवाद साधून जखमींना आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, तेलंगणातील विरोधी पक्ष बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामा राव यांनीही अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी राज्य सरकारने तत्काळ मदत जाहीर करून मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी केली आहे. या भीषण अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले असून चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकचालकाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande