
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। दक्षिण कोरियाची स्मार्टफोन दिग्गज कंपनी सॅमसंग आपली पुढील गॅलेक्सी S26 मालिका 25 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या नुसार, या मालिकेत तीन मॉडेल्स — बेसिक, प्लस आणि अल्ट्रा असतील. काही पूर्वीच्या लीकमध्ये प्रो आणि एज मॉडेल्सची चर्चा झाली होती, मात्र नव्या माहितीनुसार सॅमसंग पारंपरिक नावे कायम ठेवणार आहे. यावेळी डिस्प्ले, कॅमेरा आणि परफॉर्मन्स या तिन्ही क्षेत्रांत मोठ्या सुधारणा अपेक्षित आहेत.
गेल्या काही वर्षांत सॅमसंगनं गॅलेक्सी S मालिकेचं लॉंच जानेवारी महिन्यात केलं होतं, मात्र S26 मालिकेसाठी फेब्रुवारीच्या अखेरीची तारीख निश्चित झाल्याने यावेळी लॉंच टाइमलाइन थोडी लांबली आहे. कंपनीनं अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी बाजारात ही मालिका अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गॅलेक्सी S26 अल्ट्रा हे मालिकेतील टॉप मॉडेल असून यात 6.9 इंचाचा क्वाड एचडी OLED डिस्प्ले M14 तंत्रज्ञानासह मिळणार आहे. हे तंत्रज्ञान ब्राइटनेस आणि रंगप्रतीत मोठी सुधारणा करेल. यामध्ये AI-आधारित प्रायव्हसी स्क्रीन फीचर देण्यात येईल, ज्यामुळे पडद्यावरील मजकूर फक्त वापरकर्त्यालाच दिसेल. कॅमेरा विभागात 200 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर, नवीन अल्ट्रा-वाइड लेन्स, 50 मेगापिक्सेल टेलिफोटो (5x झूम) आणि आणखी एक 12 किंवा 50 मेगापिक्सेल टेलिफोटो (3x झूम) सेन्सर देण्यात येणार आहे. प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 फॉर गॅलेक्सी किंवा एक्सिनॉस 2600 असणार आहे. यात 16 जीबीपर्यंत रॅम, 1 टीबी स्टोरेज, 5,400 एमएएच बॅटरी, 60 वॉट फास्ट चार्जिंग आणि Qi2 मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल. फोनची जाडी केवळ 7.9 मिमी असून तो S पेन सपोर्टसह येईल. ऑपरेटिंग सिस्टम म्हणून अँड्रॉइड 16 आधारित One UI 8 देण्यात येणार आहे.
गॅलेक्सी S26 प्लसमध्ये 6.7 इंचाचा क्वाड एचडी OLED डिस्प्ले तर बेसिक मॉडेलमध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 12 मेगापिक्सेल टेलिफोटो (3x झूम) असा कॅमेरा सेटअप मिळेल. प्रोसेसर अल्ट्रासारखाच राहणार असून प्लसमध्ये 4,900 एमएएच आणि बेसिक मॉडेलमध्ये 4,300 एमएएच बॅटरी असेल. बॅटरी लाइफमध्ये थोडी सुधारणा अपेक्षित आहे.
M14 डिस्प्ले तंत्रज्ञानामुळे सर्व मॉडेल्समध्ये ब्राइटनेस आणि ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ होईल. कॅमेरा विभागात अल्ट्रा मॉडेल प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी नवी क्षमता देईल, तर AI फीचर्स जसे की प्रायव्हसी स्क्रीन आणि स्मार्ट इमेज एडिटिंग वापरकर्त्यांचा अनुभव अधिक आधुनिक बनवतील. तसेच Qi2 मॅग्नेटिक चार्जिंगमुळे ॲपलच्या MagSafe सारखा अनुभव मिळेल.
जर 25 फेब्रुवारी 2026 ही लॉंच तारीख निश्चित झाली, तर मार्चपासून भारतासह जागतिक बाजारात विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. सॅमसंगची ही नवीन मालिका ॲपलच्या iPhone 18 आणि Google Pixel 11 मालिकेशी थेट स्पर्धा करणार असून AI, कॅमेरा आणि डिस्प्लेच्या आघाडीवर S26 मालिका बाजारात नवे मानदंड निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule