
मुंबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या जिओ-हॉटस्टारच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. लवकरच कंपनी आपल्या प्रीमियम जाहिरात-मुक्त श्रेणीतील प्लॅनच्या किमतीत मोठी वाढ करण्याची तयारी करत असल्याची माहिती लीक्स आणि अहवालांमधून समोर आली आहे. सध्या वार्षिक १,४९९ रुपये असलेला प्रीमियम प्लॅन थेट २,४९९ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माध्यमांमध्ये लीक झालेल्या स्क्रीनशॉट्सनुसार जिओ-हॉटस्टारने या किंमतवाढीची प्रक्रिया सुरू केली असून ३ महिन्यांच्या पॅकसाठी सध्याच्या ४९९ रुपयांऐवजी ७९९ रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वार्षिक प्रीमियम पॅकसाठी १,४९९ रुपयांऐवजी २,४९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
या संभाव्य दरवाढीनंतरही प्रीमियम प्लॅनचे सर्व फायदे कायम राहण्याची शक्यता आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४के रिझोल्युशन, डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि एकाच वेळी चार उपकरणांवर जाहिरात-मुक्त कंटेंट पाहण्याची सुविधा मिळते. मात्र, लाइव्ह स्पोर्ट्ससारखा कंटेंट जाहिरात-मुक्त राहणार नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, अॅड-सपोर्टेड प्लॅनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मोबाईल प्लॅन ४९९ रुपये प्रति वर्ष आणि सुपर प्लॅन ८९९ रुपये प्रति वर्ष याच दरात उपलब्ध राहतील.
या दरवाढीचा फटका मात्र सिनेमा आणि क्रिकेटप्रेमींना बसणार आहे. जिओ-हॉटस्टारवर आयपीएल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांचे प्रक्षेपण होत असल्याने लाखो प्रेक्षक हा प्लॅटफॉर्म वापरतात. सध्या जिओ-हॉटस्टारचे सुमारे ३० कोटी ग्राहक आहेत. काही महिन्यांपूर्वीच डिस्ने हॉटस्टार आणि जिओ यांच्यात टायअप झाल्यानंतर अॅपचे नाव बदलून ‘जिओ-हॉटस्टार’ करण्यात आले होते. आता या नवीन दरवाढीमुळे प्रीमियम सबस्क्रायबरांना अतिरिक्त १००० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. अद्याप कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule