
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। सार्वजनिक सेवा आणि सामाजिक उपक्रमातील सहभागाची परंपरा पुढे चालू ठेवत, सुमीत ग्रुप एंटरप्रायजेसने कार्तिकी वारीच्या निमित्ताने आपल्या वार्षिक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत ५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची टीम तसेच विशेष स्वच्छता साधने आणि उपकरणे पंढरपुरात तैनात केली होती.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील भागवत एकादशीच्या उत्सवात हजारो भाविक पंढरपुरात जमतात. तसंच, दरवर्षी या उत्सवानंतरच्या स्वच्छतेची जबाबदारी सुमीत ग्रुप संभाळतो व पाच दिवस ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने देखील अशाच प्रकारची स्वच्छता मोहीम आयोजित केली जाते.
या उपक्रमाच्या माध्यमातून यात्रेकरू आणि रहिवाशांसाठी स्वच्छ, सुरक्षित तसेच निरोगी वातावरण सुनिश्चित करणे हे सुमीत ग्रुपचे उद्दिष्ट आहे. यामुळे यात्रा काळात भाविकांना एक उत्तम आणि परिपूर्ण आध्यात्मिक अनुभव मिळतो.
सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष सुमीत साळुंके म्हणाले, “ आमच्यासाठी सेवा ही व्यवसायाच्या आधी येते. आम्ही ज्या समाजाचा भाग आहोत त्याचे ऋण फेडणे हा आमचा संकल्प आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिक वारी दरम्यानचे आमचे वार्षिक स्वच्छता अभियान म्हणजे सामाजिक जबाबदारी आणि सार्वजनिक कल्याणासाठीच्या आमच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचे प्रतीक आहेत. पंढरपूर मधील अशा मोठ्या मेळाव्यांमध्ये स्वच्छता राखून, आम्ही प्रत्येक भक्ताच्या सोयी, सुरक्षितता आणि आध्यात्मिक आनंदात भर घालण्याचा प्रयत्न करत आहोत.”
हा सातत्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक कल्याण, शाश्वत सामाजिक विकास आणि नागरी जबाबदारीवर सुमीत ग्रुपच्या विशेष लक्षाचा प्रत्यय देतो आणि श्रद्धा आणि सामाजिक प्रभाव या दोन्हींचे सुंदर मिश्रण घडवून महाराष्ट्रातील विविध उपक्रमांत विश्वसनीय भागीदार म्हणून आपली भूमिका अधिक बळकट करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule