
टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या कारमध्ये काही तांत्रिक दोष आढळ्यामुळं कंपनीनं प्रसिद्ध तीन मॉडेल परत मागवले
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। टोयोटा किर्लोस्कर मोटरनं भारतात विकल्या जाणाऱ्या कॅमरी, वेलफायर आणि लँड क्रूझर या लक्झरी मॉडेल्ससाठी रिकॉल जाहीर केला आहे. पार्किंग असिस्ट ईसीयू (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट)शी संबंधित संभाव्य दोषामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. हा ईसीयू पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर सिस्टमचा भाग असून, रिव्हर्स गियरमध्ये रियर-व्ह्यू इमेज दाखवण्याचं काम करतो. कंपनीनं एकूण 4,863 वाहनांचं रिकॉल सुरू केलं असून, सॉफ्टवेअर रीप्रोग्रॅमिंगद्वारे ही समस्या दूर केली जाणार आहे. यात कॅमरीच्या 2,257, वेलफायरच्या 1,862 आणि लँड क्रूझरच्या 744 युनिट्सचा समावेश आहे. या वाहनांचे उत्पादन 2023 ते 2025 या कालावधीत करण्यात आलं आहे.
टोयोटानं स्पष्ट केलं आहे की, भारतात या दोषाशी संबंधित कोणतीही घटना नोंदवली गेली नाही, मात्र सुरक्षिततेच्या आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या दृष्टीने हे पाऊल उचललं आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, ईसीयूमधील सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे इग्निशन सुरू केल्यानंतर विशिष्ट वेळेत रिव्हर्स गियर निवडल्यास रियर-व्ह्यू इमेज काही काळ गोठू शकते किंवा इग्निशन ऑन-ऑफ झाल्यानंतर पुढच्या वेळी रियर-व्ह्यू इमेज दिसू शकत नाही. ही समस्या फक्त विशिष्ट परिस्थितीत निर्माण होते, ज्यामुळे वाहनचालकांना असुविधा होऊ शकते.
टोयोटानं हे रिकॉल खबरदारीचा आणि सक्रिय उपाय म्हणून सुरू केलं असून, अधिकृत डीलर प्रतिनिधी थेट ग्राहकांशी संपर्क साधून तपासणी व सॉफ्टवेअर अपडेट करतील. ही प्रक्रिया टोयोटा सर्व्हिस सेंटर्सवर पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.
सध्या टोयोटा कॅमरीची किंमत 47.48 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, वेलफायर 1.19 कोटी रुपयांपासून आणि लँड क्रूझर 2.15 कोटी रुपयांपासून उपलब्ध आहे. हे तीनही मॉडेल्स टोयोटाच्या प्रीमियम श्रेणीत येतात आणि भारतात आयात स्वरूपात विकले जातात. कंपनीनं ग्राहकांना आश्वासन दिलं आहे की, रिकॉल प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि ग्राहकांना सोयीस्करपणे पार पाडली जाईल. तसेच ग्राहक आपल्या वाहनाचा व्हेईकल आयडेंटिफिकेशन नंबर (व्हीआयएन) तपासून या रिकॉलमध्ये वाहनाचा समावेश आहे का हे अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule