
* नवीन जीएसटी आणि आयकर सुधारणांचा सकारात्मक परिणाम
कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : भारतातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग कर्जदाता कंपनी असलेल्या बजाज फायनॅन्स लिमिटेडने यंदाच्या सणासुदीच्या मोसमात ग्राहकोपयोगी कर्जांच्या वितरणात विक्रमी वाढ नोंदवली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर या कालावधीत वितरित झालेल्या कर्जांच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २७ टक्के ची लक्षणीय वाढ झाली आहे, तर कर्जांच्या मूल्यात २९ टक्के वाढ झाली आहे.
या विक्रमी मागणीमागे केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा’ आणि ‘वैयक्तिक आयकरातील बदलांचा मोठा सकारात्मक परिणाम असल्याचे मत कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे. जीएसटीमध्ये १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब रद्द करून केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन स्लॅब ठेवल्यामुळे अनेक ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची खरेदी क्षमता वाढली आहे.
या सणासुदीच्या काळात बजाज फायनॅन्सने अंदाजे ६३ लाख कर्जे वितरित केली. तसेच कंपनीने २३ लाख नवीन ग्राहक जोडले. या नवीन ग्राहकांपैकी ५२ टक्के ग्राहक हे पहिल्यांदाच कर्ज घेणारे होते. हे आकडे आर्थिक समावेशकता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दर्शवतात.
याबाबत बजाज फायनॅन्सचे अध्यक्ष, संजीव बजाज म्हणाले,“सरकारी सुधारणांमुळे उपभोग-केंद्रित विकासाच्या गाथेला एक नवीन गती मिळाली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू किफायतशीर बनवल्यामुळे मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आत्मविश्वासाने खरेदी करण्याचे बळ मिळाले. आमची ही २७ टक्के वाढ केवळ कर्जांची संख्या दर्शवत नाही, तर ग्राहकांची अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांकडे वळण्याची प्रवृत्ती देखील दाखवते. देशभरातील ४२०० ठिकाणी असलेल्या आमच्या २,३९,००० वितरण केंद्रांमुळे आम्ही आर्थिक समावेशकतेला बळ देत आहोत.”
टीव्हीसारख्या वस्तूंच्या कर्जांमध्ये ४० इंच आणि त्याहून मोठ्या स्क्रीनच्या मॉडेल्सना ७१ टक्के वित्तपुरवठा झाला, जो ग्राहकांच्या उच्च-उत्पादनांच्या मागणीकडे होत असलेला बदल दर्शवतो. या आकडेवारीवरून, सणासुदीच्या मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या उपभोग क्षमतेला मोठा आधार मिळत असल्याचे स्पष्ट होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी