
दुबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)आशिया कप २०२५ दरम्यान झालेल्या वादाच्या सुनावणीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांना मुकणार आहे. शिवाय, खेळाच्या जागतिक प्रशासकीय संस्थेने भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हॅरिस रौफ यांना आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांच्यावर आर्थिक दंड आणि निर्बंध लादले आहेत. आशिया कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान तीन वेळा भिडले. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून आशिया कपचे विजेतेपद जिंकले. पण विजेत्यांना अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही.
भारताविरुद्धच्या दोन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये दोनदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफला त्याच्या सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. रौफ यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात कलम २.२१ अंतर्गत दोषी आढळला होता. यासाठी, त्याला आपल्या सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले होते. त्यानंतर भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याच कलमाचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल त्याला त्याच्या सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंड आणि दोन अतिरिक्त डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले होते.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवलाही आयसीसीने त्याच्या सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंड ठोठावला आहे. सूर्यकुमारने सामन्यानंतर भारतीय सैन्याला पाठिंबा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांशी एकता व्यक्त करणारे विधान केले होते. शिवाय, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एक डिमेरिट पॉइंट मिळाला, तर अर्शदीप सिंग आणि पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला आयसीसीने ताकीद दिली आहे. आयसीसीने म्हटले आहे की, हे सर्व उल्लंघन लेव्हल १ अंतर्गत येतात, ज्यामुळे क्रिकेटपटूंना आपल्या सामन्याच्या फीच्या जास्तीत जास्त ५० टक्के दंड आणि एक ते दोन डिमेरिट पॉइंट्स मिळू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे