
ढाका, 5 नोव्हेंबर (हिं.स.) बांगलादेश महिला क्रिकेट संघात एक मोठा वाद निर्माण झाला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जहांआरा आलमने कर्णधार निगार सुलताना जोतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यात तिने ज्युनियर क्रिकेचपटूंशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हे आरोप पूर्णपणे निराधार आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
जहांआरा आलमने एका मुलाखतीत अनेक धक्कादायक दावे केले. ती म्हणाली, हे काही नवीन नाही. जोती (निगारचे टोपणनाव आणि तिच्या जर्सीवरील नाव) ज्युनियर क्रिकेपटूंना खूप मारहाण करते. विश्वचषकादरम्यान अनेक ज्युनियर क्रिकेटपटूंनी मला पुन्हा चूक करू नका, अन्यथा त्यांना पुन्हा थप्पड मारली जाईल असे सांगितले. काहींनी तर असेही म्हटले की, त्यांना कालच मारहाण झाली. दुबई दौऱ्यादरम्यान कर्णधार निगारने एका ज्युनियर क्रिकेटपटूला खोलीत बोलावून तिला थप्पड मारल्याचा दावाही तिने केला.
जहांआराने सांगितले की, संघाचे वातावरण हळूहळू गढूळ होत आहे. २०२४ मध्ये युएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान तिला गंभीर मानसिक आरोग्य समस्या आल्याचे तिने स्पष्ट केले, ज्यामुळे तिला दोन महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला. ती म्हणाली, मी एकटी नाही; बांगलादेश संघातील जवळजवळ प्रत्येक क्रिकेटपटूला कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागत आहे. एक किंवा दोन क्रिकेटपटूंना जास्त विशेषाधिकार मिळतात, तर उर्वरित क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष केले जाते. जहानाराने असाही आरोप केला की २०२१ मध्ये वरिष्ठ क्रिकेटपटूंना काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यांना हळूहळू संघातून बाहेर काढण्यात आले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जहानाराचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. एका निवेदनात, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, हे सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत असताना असे गंभीर आरोप अत्यंत निराशाजनक आहेत. बोर्डाने म्हटले आहे की, सध्याचे महिला संघाचे वातावरण पूर्णपणे एकसंध आणि व्यावसायिक आहे आणि कर्णधार निगार सुलतानावरील कोणत्याही आरोपांना समर्थन देणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश क्रिकेटशी आता कोणताही संबंध नसलेली क्रिकेटपटू अशी दिशाभूल करणारी विधाने करत आहे हे दुर्दैवी आहे.
आतापर्यंत कर्णधार निगार सुलतानाने या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. संघाच्या अंतर्गत वातावरणाबाबतच्या या आरोपांमुळे बांगलादेश महिला क्रिकेटच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण बीसीबीने पुन्हा एकदा सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या महिला संघाच्या नेतृत्वावर, क्रिकेटपटूंवर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि कोणत्याही चौकशीची आवश्यकता नाही. जहांआरा आणि निगार यांच्यातील हा वाद केवळ दोन क्रिकेटपटूंमधील संघर्ष नाही तर बांगलादेश महिला क्रिकेट संघातील वाढत चाललेल्या मतभेदांचे प्रतिबिंब आहे. निगार किंवा बोर्ड पुढील कारवाई काय करते आणि या वादाचा संघाच्या एकतेवर परिणाम होतो का हे पाहणे बाकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे