
नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. बांका येथे आज, बुधवारी आयोजित निवडणूक प्रचार सभेत राजनाथ यांनी हा आरोप केला. राहुल गांधींनी सशस्त्र दलांमध्ये आरक्षणाची मागणी केलीय त्यापार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री बोलत होते.
बिहारच्या जमुई जिल्ह्यातील सभेत राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल यांना नेमके काय झाले आहे ? ते संरक्षण दलांमध्ये आरक्षणाचा मुद्दा उचलत आहेत. ते देशात गोंधळ निर्माण करू पाहत आहेत. आपली सैन्य दले या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे आहेत. राहुल गांधींनी समजून घेतले पाहिजे की देश चालविणे हा मुलांचा खेळ नाही. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पडल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूर थांबविण्यात आले आहे, बंद नाही केले. जर दहशतवादी पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील, तर आम्ही कठोर कारवाई करू. भारत कधीच कोणाला चिथावत नाही, पण जर कोणी आम्हाला चिथावले, तर आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशारा राजनाथ यांनी यावेळी दिला.
राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) सत्ताकाळावर टीका करताना सांगितले की, “त्या काळात लोकांना धमकावले जात होते. काँग्रेसने कधीही सीमावर्ती भागांत चांगल्या रस्त्यांचे जाळे उभारले जावे, अशी इच्छा व्यक्त केली नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच एनडीएच्या बाजूने स्पष्ट लाट आहे. आम्ही दोन-तृतीयांश बहुमताने पुन्हा सत्ता स्थापन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीए कधीही जात, धर्म किंवा पंथाच्या आधारावर भेदभाव करत नाही. विकसित बिहार घडविणे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. राजद नेत्यांनी नेहमीच लोकांना धमकावले आणि कधीच बिहारच्या विकासासाठी काम केले नसल्याचे राजनाथ यांनी सांगितले.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी