महादेव ऍप प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने दिले उप्पलच्या अटकेचे आदेश
नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) महादेव सट्टेबाजी ऍपचे सहसंस्थापक रवी उप्पल याला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. उप्पल दुबईहून पळून गेल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, आर्थि
सुप्रीम कोर्टा लोगो


नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) महादेव सट्टेबाजी ऍपचे सहसंस्थापक रवी उप्पल याला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. उप्पल दुबईहून पळून गेल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, आर्थिक गुन्हेगारांना न्यायालय आणि तपास यंत्रणांचा खेळ करु दिला जाणार नाही. उप्पलच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ईडीला उप्पलचा शोध घेऊन तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, पांढरपेशा गुन्हेगारांसाठी न्यायालये आणि तपास संस्था खेळणी नाहीत. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने उप्पलच्या कायद्यापासून पळ काढण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकारचे वर्तन न्यायालयाच्या अंतःकरणाला हादरवणारे आहे. आता ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी उप्पल भारतीय तपास संस्थांपासून लपून बसला असून तो दुबईहून अज्ञात ठिकाणी पळून गेला आहे. यामुळे संयुक्त अरब अमिरातीतील अधिकार्‍यांनी त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया थांबवली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ईडीला निर्देश दिले की, उप्पलचा शोध घेऊन शक्य तितक्या लवकर अटक करावी. न्यायालय त्याची ती याचिका ऐकत होते, ज्यात त्याने छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या 22 मार्चच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्या आदेशात रायपूर येथील मनी लाँड्रिंगच्या खटल्यात त्याने उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.

ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, उप्पलला 2023 मध्ये इंटरपोल रेड कॉर्नर नोटीसनंतर दुबईत अटक करण्यात आली होती, परंतु २०२४ मध्ये सुरू झालेली प्रत्यर्पण प्रक्रिया तो पळून गेल्याने अडखळली. राजू यांनी सांगितले की, अनेक आर्थिक गुन्हेगार असे देश निवडतात, ज्यांच्याशी भारताची प्रत्यर्पण संधी नाही.खंडपीठाने पुढील सुनावणीची तारीख 14 नोव्हेंबर निश्चित करताना, रवीच्या वकिलाला सांगितले की त्यांनी त्याला भारतात परत येऊन न्यायप्रक्रियेचा सामना करण्यास प्रवृत्त करावे. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, या प्रकरणात पुढे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही.

महादेव सट्टेबाजी ऍपची सुरुवात 2018 मध्ये रवी उप्पल आणि त्याचा सहकारी सौरभ चंद्राकर यांनी केली होती. या अ‍ॅपच्या माध्यमातून अवैध ऑनलाइन सट्टेबाजी चालवली जात होती. तपास संस्थांच्या मते, हा घोटाळा सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा असून तो अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे.

सौरभ चंद्राकरला ऑक्टोबर 2024 मध्ये दुबईत अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधातील प्रत्यर्पण प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande