
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। जुबेर हंगरगेकरला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या साथीदारांनी या ठिकाणावरून काही संशयित पुस्तके-प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे जमा केली. त्यानंतर ती सर्व कागदपत्रे काळेपडळ येथील एका धार्मिक स्थळाच्या मोकळ्या जागेत जाळल्याचे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ‘एटीएस’च्या तपास पथकाने काळेपडळ येथील धार्मिक स्थळाच्या मोकळ्या जागेचा पंचनामा करून अर्धवट जळालेली काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. जुबेरचा साथीदार एका रिक्षातून येऊन कागदपत्रे जाळत असल्याचे तेथील ‘सीसीटीव्ही’मध्ये निदर्शनास आले आहे. याबाबत सात साक्षीदारांकडे तपास करण्यात आला आहे. याशिवाय जुबेर व त्याचे साथीदार कौसरबागेतील एका इमारतीच्या तळघरातील मदरशात (मकतब) एकत्रित यायचे. तपास अधिकाऱ्यांनी या ठिकाणचा पंचनामा केला असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.जुबेर इलियास हंगरगेकर (वय ३७, रा. कोंढवा) याला ‘एटीएस’ने २७ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी दुपारी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते. त्या वेळी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. सहायक पोलिस आयुक्त अनिल शेवाळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. एक टीबी डेटा जप्त ः जुबरेच्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून सुमारे एक टीबी डेटा जप्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड