
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।थिनर प्राशन केलेल्या रुग्णाला तपासण्यासाठी आलेल्या निवासी महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा प्रकार सिव्हिल रुग्णालयात घडला आहे. दुसऱ्या रुग्णाचा केस पेपर डॉक्टर पाहत होत्या. त्यावेळी जवळ थांबलेल्या रुग्णाने डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पुष्पक तिपण्णा तळभंडारे (वय २८, रा. अशोक नगर, भगतसिंग मार्केट, सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे.एका डॉक्टरने रुग्णावरील उपचारासाठी निवासी महिला डॉक्टरला कॉल करून बोलावले. पी. जी. हॉस्टेलवरून तातडीने त्या महिला डॉक्टर रुग्णालयात पोचल्या. थिनर प्राशन केलेल्या रुग्णाचे केस पेपर डॉक्टर पहात होत्या. शेजारी उभारलेल्या व्यक्तीने डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला आणि बाजूला उभारून वाईट नजरेने एकटक पाहू लागला. घाबरलेल्या महिला डॉक्टरने तेथील सेक्युरिटी कर्मचाऱ्यास बोलावले आणि हकिगत सांगितली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पारडे तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड