ऑनलाइन गेमिंगद्वारे तब्बल ८३ कोटींची फसवणूक; १२ आरोपींचा पर्दाफाश
रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑनलाइन गेम खेळण्याच्या आडून देशभरात तब्बल ८३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी ५२ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड आणि एक का
Fraud of Rs 83 crore through online gaming; 12 accused exposed


रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑनलाइन गेम खेळण्याच्या आडून देशभरात तब्बल ८३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी ५२ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड आणि एक कार जप्त केली आहे. सायबर क्राईम पोलिसांनी केलेली ही कारवाई राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट ऑनलाइन गेमिंग अॅपच्या माध्यमातून लोकांना खेळा आणि जिंका या आश्वासनावर मोठ्या रकमांचे प्रलोभन दाखवून पैसे उकळले. सुरुवातीला काही रकमेचे बक्षिस देऊन लोकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अधिक पैसे गुंतविल्यास दुप्पट परतावा मिळेल, असे सांगून हजारो लोकांना या जाळ्यात ओढण्यात आले. मात्र, काही दिवसांनंतर अॅप अचानक बंद करण्यात आला आणि सर्व पैसे गायब झाले.

सायबर पोलिसांच्या तपासानुसार, या टोळीने देशातील विविध बँक खात्यांद्वारे आर्थिक व्यवहार केले. आरोपी परदेशी सर्व्हर आणि व्हर्च्युअल नंबर वापरून फसवणूक करत होते. प्राप्त तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांत एकाचवेळी छापे टाकून मुख्य सूत्रधारासह इतर ११ जणांना अटक केली.

या प्रकरणात सायबर पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक कार्यरत असून, फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी ऑनलाइन गेमिंग अॅप्सवर पैसे गुंतवू नयेत आणि जिंकण्याचे प्रलोभन दाखवणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. ऑनलाइन फसवणुकीच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा डिजिटल युगातील सायबर सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande