
रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। अलिबाग शहरातील म्हात्रे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात जवळपास २८ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याची आई तसेच त्याची होणारी पत्नी (रा. आवरे, ता. उरण) हे तिघे २९ मे २०२५ रोजी अलिबाग पीएनपी बिल्डिंग क्र. ०२ मधील फिर्यादी यांच्या मालकीच्या म्हात्रे ज्वेलर्स दुकानात आले होते. आरोपीने फिर्यादीशी असलेल्या जुन्या ओळखीचा फायदा घेत “लग्नाकरिता दागिने खरेदी करायचे असून काही दागिने घरी घेऊन पसंतीनुसार निवड करून उरलेले परत करेन,” असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपीस एकूण ३३७.४३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले. त्यापैकी ११६.४३० ग्रॅम चे दागिने आरोपीने खरेदी करून पैसे अदा केले, परंतु उर्वरित २२१ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने (किंमत सुमारे ₹२८,७३,०००) परत न करता आरोपी पसार झाला.या फसवणुकीत आरोपी, त्याची आई व त्याची होणारी पत्नी या तिघांनी संगनमताने कपटीपणा करून फिर्यादीची दिशाभूल केली असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गु.र.नं. २००/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २२:५७ वाजता अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि श्रीमती सरिता मुसळे या करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके