
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।नायलॉन मांजाची विक्री करण्यावर निर्बंध आहेत. तरीदेखील बिलाल इब्राहिम शेख (वय ३४, रा. आनंद नगर-१, मजरेवाडी) याने स्वत:च्या फारुख किराणा दुकानात मांजा विक्रीसाठी ठेवला होता. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना गस्त घालताना नई जिंदगी परिसरात विमानतळामागे एक अल्पवयीन मुलाच्या हाती नायलॉन मांजा आढळला. पोलिसांनी त्याच्या पालकांना बोलावून घेतले आणि त्याच्या पालकांना समज दिली. लहान मुलांच्या हाती मांजा न देण्याची समज देऊन त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे.
दुसरीकडे त्याच परिसरातील मजरेवाडी भागात बिलाल शेख याने त्याच्या किराणा दुकानात विक्रीसाठी नायलॉन मांजा ठेवला होता. शासनाने बंदी घातल्याची माहिती असतानाही तो छुप्या पद्धतीने बेकायदा मांजा विकत होता. दरम्यान, कोणीही बंदी असलेला मांजा वापरू नये, पतंग उडविताना त्याला हा मांजा दिसल्यास कठोर कारवाई केली जाईल, असाा इशारा एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड