
रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। मुरुड तालुक्यातील महावीर वाटीका, येसदे येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या रुममध्ये चोरीचा प्रकार घडला असून, रुम पार्टनरनेच १ लाख ३२ हजार रुपयांचा मोबाईल आणि कॅमेरा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे घोडबंदर रोड, पावन चाळ, आझाद नगर बसस्टॉपजवळ, ठाणे येथील रहिवासी असून सध्या महावीर वाटीका, येसदे (ता. मुरुड) येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या रुम क्र. १०१ मध्ये ठेवलेल्या बॅगेत मोबाईल फोन आणि कॅमेरा असा एकूण ₹१,३२,०००/- किमतीचा माल ठेवला होता.
दरम्यान, फिर्यादीच्या रुम पार्टनरने — रा. सी.बी.-१७४, रिंग रोड, नरैना इंडस्ट्रियल इस्टेट, साऊथ वेस्ट दिल्ली — याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, स्वतःच्या फायद्यासाठी व लबाडीच्या इराद्याने सदर माल चोरी केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीस दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २०:३२ वाजता अटक केली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६२/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सफौ. श्री. मिलिंद सुर्वे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके