
नंदुरबार, 6 नोव्हेंबर (हिं.स.) म्हसावद (ता. शहादा) येथील पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी शिवारातील शेतात गांजाची लागवड झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात स्पष्ट झाले असून, तब्बल दहा लाखांचा ९८ किलो ३४७ ग्रॅमचा गांजा झाडांसह इतर मुद्देमाल पोलीस पथकाच्या हाती लागला. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना ३ नोव्हेंबरला म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत जुनी पिंप्राणी शिवारात सुरत्या ऊर्फ सुरसिंग पाडवी याने शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास माहिती देत कारवाई करण्याची सूचना केली. पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी गावात जाऊन सुरत्या ऊर्फ सुरसिंग डुगऱ्या पाडवी याच्या शेतशिवारातील राहत्या घराजवळ थांबले. मात्र, तो घरी मिळून आला नाही. त्याच्या घराजवळील शेताची पाहणी करता, तेथे कापसाच्या पिकात प्रतिबंधित असलेला गांजासदृश झाडांची लागवड करून जोपासना केल्याचे दिसून आले.पथकाने तेथून तब्बल नऊ लाख ८३ हजार ४७० रुपये किमतीचा ९८ किलो ३४७ ग्रॅमच्या गांजा झाडांसह इतर मुद्देमाल हस्तगत केला. संशयित सुरत्या ऊर्फ सुरसिंग डुगऱ्या पाडवी (रा. जुनी पिंप्राणी, पोस्ट रामपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५ चे कलम २० (अ) (ब), २२ (क) वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर