
छत्रपती संभाजीनगर, 6 नोव्हेंबर (हिं.स.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकांच्या ७३ जागांसाठी नव्याने अर्ज भरण्यास १८ नोव्हेम्बरपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. तसेच चार अधिष्ठातांसह संवैधानिक अधिका-यांच्या एकुण आठ जागांसाठीही अर्ज मागविण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असून ही प्रक्रिया केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन होणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह २० सदस्य उपस्थित होते. या बैठकीत चार अधिष्ठातांसह एकूण आठ संवैधानिक अधिका-यांची पदे भरण्यासाठी १५ दिवस अर्ज मागविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य राज्यशासनाने विविध विभागात रिक्त असलेल्या व मान्यता दिलेल्या ७३ शिक्षकांच्या पदासाठीही अर्ज मागविण्यास मान्यता देण्यात आली. विद्यापीठाच्यावतीने जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये संवैधानिक अधिका-यांच्या १० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले. यापैकी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकपद भरण्यात आले. तसेच अधिष्ठाता चार पदे, संचालक नवोपक्रम, संचालक -धाराशिव उपपरिसर, संचालक आजीवन शिक्षण विभाग व संचालक ज्ञान स्त्रोत केंद्र या आठ पदासाठी शासनाची मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसांची मुदत देऊन अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांसाठी एप्रिल २०२५ मध्ये अर्ज मागविण्यात आले. सदर पदासाठी नव्याने अर्ज मागविण्यास मान्यता देण्यात आली. १५ दिवसांची मुदत देऊन अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रशासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी ’समर्थ पोर्टल’ तयार केले असून या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या नुसार या सर्व पदासांठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संकेत स्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जाची हार्ड कॉपी (दोन प्रतीत) दाखल करावी लागणार आहे. सदर आवेदन दोन प्रतीत आस्थापना विभागात दाखल करावे लागणार आहेत. यापूर्वी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनाही अर्जात दुरुस्ती करता येईल. तसेच शिक्षक पदासाठी २ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित जाहिरातीनुसार अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना पुन्हा शुल्क न भरता अर्जात दुरस्स्ती व काही अपग्रेडेशन करता येणार आहे. तसेच नवीन नियमावलीनुसार उमेदवारांनी आपला 'एटीआर' भरणे आवश्यक आहे. तसेच सम्बधित कागदपत्रासह हार्ड कॉपी जमा कारवी लागणार आहे, असेही कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे. या संबधीची विस्तृत माहिती विद्यापिठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis